अजय डांगे ■ अकोला कुरिअर कंपन्याच्या माध्यमातून दर आठवड्यात जिल्ह्यात ५ ते ६ कोटींची देवाण-घेवाण होत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. बुकी, सटोडियांसह इतरही अवैध धंद्यात गुंतलेल्या टोळ्या हवालाच्या माध्यातून कोट्यवधी रुपयांचे हस्तांरण करतात. यंत्रणांचे हात 'ओले' होत असल्याने हा गोरखधंदा अव्याहतपणे सुरू असल्याची चर्चा हवाला रॅकेटचा पर्दाफाश झाल्याच्या निमित्ताने सुरू झाली आहे. जिल्ह्यातील बुकी, सटोडियांचे जाळे देशभरात पसरले असल्याचे यापूर्वी झालेल्या अनेक कारवायांच्या निमित्ताने समोर आले आहे. टोळीतील सदस्य या काळय़ा पैशाची काही कुरिअर कंपन्यांच्या माध्यमातून देवाण-घेवाण करीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कुरिअरच्या माध्यमातून पैशांचे ट्रान्सफर होण्याच्या प्रक्रियेमुळे शासनाचा कर तर बुडतोच, शिवाय अवैध व्यवसायालाही चालना मिळते. दरम्यान, हवाला रॅकेटचा पर्दाफाश झाल्याच्या निमित्ताने कुरिअरच्या पैशांवर दरोडा टाकल्याच्या घटनेची चर्चा सुरू झाली आहे. ही घटना सप्टेंबर २0१३ मध्ये जुने शहरात घडली होती. आरोपींनी कुरिअरचे २१ लाख रुपये लुटले होते. यामध्ये कुरिअर कंपनीचा एक व्यवस्थापकही सहभागी झाला होता. - सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दर सोमवारी कुरिअर कंपनीकडे हा पैसा जमा होतो. आठवड्यातून एकाच वेळी ही प्रक्रिया होते. आयकरसह इतरही विभागाला अंधारात ठेवून काही कुरिअर कंपन्या हा पैसा गोळा करतात. त्यामुळे या कारवाईच्या निमित्ताने पोलिसांनी हवाला रॅकेटची पाळेमुळे खोदावी, अशी मागणी होत आहे. खातरजमा करण्याची तसदीही नाही - कुरिअर कंपनीच्या कार्यालयातील कर्मचारी केवळ खबरदारी घेत असल्याचा दिखावा करतात. हे कर्मचारी ग्राहक पाकीट घेऊन गेल्यानंतर त्याला पाकिटात काय आहे, हे विचारतात. कर्मचारी तशी नोंद पावतीवर करतात; मात्र हे कर्मचारी पाकीट फोडून ग्राहकाने सांगितलेल्या माहितीची खातरजमा करण्याची तसदी घेत नाहीत. फलक केवळ भिंतीवर.. - काही कुरिअर कंपन्या आम्ही देशाच्या सुरक्षेबाबत काळजी घेतो, याचाही दिखावा करतात. या कंपन्या कार्यालयातील दर्शनी भागावर 'ग्राहकाकडून येणार्या पाकिटात स्फोटासारखे साहित्य नाही ना याची काळजी घेण्यात येते', असा फलकही लावतात; मात्र पाकीट फोडून खातरजमा करीत नाहीत. बुकींचे कुरिअर कंपन्यांशी लागेबांधे - बुकी, सटोडियांचे आणि काही कुरिअर कंपन्यांचे लागेबांधे असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. काही बुकी-सटोडियांनी तर स्वत:ची कुरिअर सेवाच सुरू केली आहे. मॅचवरील सट्टय़ासाठी कुरिअरमधून एका जिल्ह्यातून दुसर्या जिल्ह्यात मोठी रक्कम पाठविण्यात येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अकोल्यात 'जय माता दी', 'बालाजी' या टोपण नावाने बुकींच्या टोळ्या आहेत. या टोळ्यांचे जाळे महाराष्ट्रासह राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश आणि आंध्र प्रदेशातही आहे. आकोट तालुक्यातील 'सट्टा नरेश'चे जाळे तर पश्चिम बंगालमध्येही आहे. ना हाक ना बोंब.. - कुरिअरच्या माध्यमातून पाठविण्यात येणारा पैसा हा वैध मार्गाने कमविलेला असतोच असे नाही. त्यामुळे संबंधितांना हा पैसा बॅँक अथवा इतर वैध माध्यमातून पाठविणे अडचणीचे होते. परिणामस्वरूप असा पैसा कुरिअरच्या माध्यमातून पाठविण्यात येतो. असा पैसा चोरी गेल्यास कोणीच फार आरडाओरड करीत नाही. |
|