दिवसभरात दोघांचा मृत्यू; नऊ पॉझिटिव्ह, ३८ जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 18:00 IST2020-10-31T18:00:06+5:302020-10-31T18:00:25+5:30
Akola CoronaVirus News आणखी नऊ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८,३९६ झाली आहे.

दिवसभरात दोघांचा मृत्यू; नऊ पॉझिटिव्ह, ३८ जण कोरोनामुक्त
अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग मंदावला असला, तरी मृत्यूचे सत्र सुरुच आहे. शनिवार, ३१ आॅक्टोबर रोजी २७ वर्षीय महिलेसह दोघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २८१ वर पोहचला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी नऊ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८,३९६ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे ८४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी सात रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ७५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये जठारपेठ, मुर्तिजापूर, केशव नगर, वरुळ जऊळका ता. अकोट, मराठा नगर, शासकीय वसाहत, वरुड बु., बार्शीटाकळी व बाभूळगाव ता. पातूर येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
महिला व पुरुष उपचारादरम्यान दगावले
शनिवारी कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये वरुळ जऊळका ता. अकोट येथील २७ वर्षीय महिला व जठारपेठ येथील ६९ वर्षीय पुरुष या दोघांचा समावेश आहे. दोघांनाही अनुक्रमे २९ व २८ आॅक्टोबर रोजी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
३८ जणांना डिस्चार्ज
शनिवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १४, हॉटेल रिजेन्सी येथून तीन, ओझोन, आयकॉन व युनिक हॉस्पिटल येथून प्रत्येकी एक, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले १८ अशा एकूण ३८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
२१३ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८,३९६ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ७,९०२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २८१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत २१३ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.