बॉम्बशोधक, नाशक पथकाकडून रेल्वे रुळाची तपासणी!
By Admin | Updated: May 27, 2017 00:48 IST2017-05-27T00:48:42+5:302017-05-27T00:48:42+5:30
माना परिसरात पाहणी; डॉग स्कॉडही कार्यरत

बॉम्बशोधक, नाशक पथकाकडून रेल्वे रुळाची तपासणी!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: बॉम्बशोधक आणि नाशक पथकाकडून शुक्रवारी माना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील माना ते कुरूम रेल्वे रुळावर तपासणी करण्यात आली. यासोबतच डॉग स्कॉडकडूनही या परिसरातील रेल्वे रुळाची पाहणी करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या आदेशानंतर माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार मिलिंद बहाकार यांच्या मार्गदर्शनात ही तपासणी करण्यात आली असून, सदर तपासणी घातपाताच्या संशयावरून करण्यात आली.
अकोला शहरात झालेला सिलिंडरचा स्फोट, त्यानंतर बार्शीटाकळी तालुक्यात रेल्वे रुळावर बॉम्ब ठेवून रेल्वे रूळ उडविण्याचा कट उधळण्यात आला होता. या दृष्टीने पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे माना ते कुरूम या २० किलोमीटर परिसरात रेल्वे रुळाची तपासणी करण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर घातपाताच्या संशयावरून माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार मिलिंद बहाकार आणि बॉम्बशोधक आणि नाशक पथकाकडून ही तपासणी करण्यात आली. रेल्वे रुळावरून काही लोखंडी तार जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. ही तपासणी माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार मिलिंद बहाकार यांच्या मार्गदर्शनात पीएसआय श्रीकृष्ण पाटील, नंदकिशोर टिकार, पोलीस कर्मचारी पवार, सचिन कुलट, दुबे आणि बॉम्बशोधक आणि नाशक पथकाचे खान, शेख यांनी केली. या तपासणीत डॉग स्कॉडमधील ‘टायगर’ नामक श्वानही दाखल होता.