अंध धनश्रीच्या मदतीसाठी धावले प्रकाशदूत
By Admin | Updated: June 17, 2017 01:06 IST2017-06-17T01:06:42+5:302017-06-17T01:06:42+5:30
दहावीच्या परिक्षेत नेत्रदीपक यश : डोळस विद्यार्थ्यांसोबत केली स्पर्धा

अंध धनश्रीच्या मदतीसाठी धावले प्रकाशदूत
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट: दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या अकोटच्या धनश्री हागे या मुलीने शिक्षणात इंद्रधनुष्याच्या रंगांची उधळण करीत नेत्रदीपक यश मिळविले . सर्वसामान्य विद्यार्थ्यांसोबत डोळस शाळेत शिकत तिने दहावीच्या २०१७ च्या परीक्षेत ९५ टक्केगुण प्राप्त केले. जिद्द, संघर्ष अन् खंबीरतेने डोळे नसतानाही संपूर्ण राज्यात तिने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. तिच्या या जिद्द व संघर्षाची यशोगाथा ‘लोकमत’ने प्रकाशित करताच १४ जून पासून धनश्रीचे कौतुक करण्याकरिता रीघ लागली आहे.
स्थानिक जलतारे प्लॉट येथील सोनल व अशोक हागे यांच्या मुलीने अथक परिश्रम घेत नेत्रदीपक यश मिळविले आहे. धनश्रीला एकूण ९४.८० टक्के गुण असून, सामाजिक शास्त्र विषयात १०० पैकी १०० गुण आहेत. तिने एकूण ५०० पैकी ४७४ गुण प्राप्त केले आहेत. तिचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. तिच्या यशाची गाथा ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे यांनी अकोट शहराचे प्रथम नागरिक म्हणून धनश्री व तिच्या आई-वडिलांचा सत्कार केला. यावेळी माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे, शिक्षण सभापती लता साबळे, नगरसेवक मंगेश लोणकर, वासुदेव भास्कर, जितू जेस्वाणी, डॉ. शशिकांत पाथ्रीकर, संतोष मिसळे, हरीश टावरी यांची उपस्थिती होती. शिवाय दिवसभर धनश्रीचे कौतुक करण्याकरिता विविध पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, संस्था, संघटनेचे पदाधिकारी यांनी भेट दिली. अकोट शहरचे ठाणेदार सी.टी. इंगळे, भूमी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तुषार अढाऊ व सामाजिक कार्यकर्त्या चंचल पितांबरवाले यांनी धनश्रीचे कौतुक केले. तसेच तिच्या पुढील शिक्षणासाठी मुंबई येथे अंध विद्यार्थ्यासाठी तीन महिन्यांचे अद्ययावत बोलके तंत्रज्ञान शिकण्यासाठी राहण्याची व्यवस्था केली. या सोईमुळे त्यांच्या परिवाराचे डोळे आनंदाने पाणावले. तसेच जि.प. अध्यक्ष संध्या वाघोडे, प्रभारी तहसीलदार राजेश गुरव,
शिक्षणाधिकारी संदीप मालवे, बीडीओ कालीदास तापी आदींनी तिची भेट घेऊन तिचे कौतुक केले. तसेच पुढील शिक्षणासाठी मदत देण्याचे आश्वासन दिले.