सट्टा बाजारात भाजपचे भाव ‘जैसे थे’
By Admin | Updated: May 13, 2014 00:17 IST2014-05-13T00:16:47+5:302014-05-13T00:17:19+5:30
लोकसभा निवडणूक : केवळ पाच पैसे दर; सर्वात कमी भाव

सट्टा बाजारात भाजपचे भाव ‘जैसे थे’
अकोला : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात सोमवारी मतदान झाल्यानंतर सट्टा बाजारात भाजपचे दर सर्वात कमी असल्याची माहिती बुकींनी दिली. निवडणुकीच्या निकालाचा अंदाज घेण्यासाठी बुकी आणि सटोडियांनीही आपले घोडे दामटण्यास सुरुवात केली असून, अकोला मतदारसंघात सट्टा बाजाराचा कौल भाजपच्या उमेदवारालाच आहे.
अकोला मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारावर सर्वात कमी अर्थात पाच पैसे लावले जात आहे. हेच दर मतदानाच्या दुसर्या दिवशीही होते. अकोला लोकसभा मतदारसंघात १0 एप्रिल रोजी मतदान झाले. मतदान आटोपल्यानंतर सट्टा बाजारातील बुकी व सटोडियांनी भाजपच्या उमेदवारावर सर्वात कमी म्हणजे केवळ पाच पैशांचा भाव असल्याचे सांगितले होते. भारिप-बमसंच्या उमेदवाराला १५ पैशांचा भाव दिला जात असल्याची माहिती होती. काँग्रेस उमेदवारावरही काहींनी बोली लावली होती; परंतु काँग्रेस उमेदवाराला किती दर मिळत आहे, हे कोणीच ठामपणे सांगू शकले नव्हते. दरम्यान, सोमवारी देशभरात लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया संपली. या पृष्ठभूमीवर बुकी आणि सटोडियांशी चर्चा केली असता अकोला लोकसभा मतदासंघातील लढतीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले. काही बुकींनी कॉँग्रेस आणि भारिपवर पैसे लावल्या जात नसल्याचे सांगितले. विजयश्री खेचून आणण्याची दाट शक्यता असलेल्या भाजपच्या उमेदवाराबाबतच बोला, असे काही बुकी आणि सटोडिये म्हणाले. राजकीय विश्लेषकांच्या मते मात्र अकोला मतदारसंघात तिहेरी लढत होणार आहे. सट्टा बाजार बरोबर की राजकीय विश्लेषकांच्या अंदाज खरा होता, हे शुक्रवारी मतमोजणीच्या दिवशी स्पष्ट होईलच.