भाजपाच्या तयारीने शिवसेनेत अस्वस्थता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 14:17 IST2019-06-24T14:14:00+5:302019-06-24T14:17:48+5:30
भाजपाने २८८ जागांवर लढण्याची तयारी केल्यामुळे शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

भाजपाच्या तयारीने शिवसेनेत अस्वस्थता!
अकोला: गेली साडेचार वर्षे एकमेकांचे उणेदुणे काढत भाजपा, शिवसेनेने ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी युती करून घवघवीत यश मिळविले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही युती कायम राहील, यात शंका नसतानाच भाजपाने २८८ जागांवर लढण्याची तयारी केल्यामुळे शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. अकोल्यात आधीच भाजपाने पाचपैकी चार मतदारसंघ जिंकून सेनेसमोर अडचण उभी केली आहे. त्यातच आता भाजपा सर्व जागांचीच तयारी करीत असल्याने युतीधर्मच धोक्यात येण्याची चिन्हे आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने ‘अब की बार २२० च्या पार’, असे ध्येय ठेवत २८८ जागांवर तयारी करण्याचे निर्देश कार्यकर्त्यांना दिले आहेत. या निर्देशावरून सध्या युतीमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीही भाजपाने स्वबळावर सर्व मतदारसंघ जिंकण्याची रणनीती आखत रणशिंग फुंकले होते; मात्र ऐनवेळी भाजपा, सेना एकत्र आल्याने आता भाजपाला स्वबळाचा नारा सोडून देत युतीधर्म पाळावा लागला. आताही सर्व जागांच्या माध्यमातून स्वबळाचाच नारा दिला आहे. या पृष्ठभूमीवर अकोल्यातील इच्छुकांमध्ये अस्वस्थता आहे.
अकोल्यातील पाच विधानसभा मतदारसंघांपैकी बाळापूर वगळता भाजपाने चार मतदारसंघांत विजय मिळविला आहे. त्यामुळे सेनेला हवे असलेले बाळापूर, अकोट किंवा शहरी भागातील अकोला पश्चिम यापैकी दोन मतदारसंघांचा गुंता आहे. त्यात स्वबळाची भाषा सुरू झाल्याने अनेक इच्छुकांना मात्र संधी दिसत आहे.
सध्या शिवसेनाही स्वबळाचीच तयारी करीत आहे. प्रत्येक गावातील प्रत्येक वॉर्डासाठी शाखा सुरू करून बुथनिहाय बांधणी केली जात आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रातील एकही गाव यामधून सुटणार नाही, अशी काळजी घेण्याचे निर्देश प्रत्येक तालुका पदाधिकाऱ्यांना दिले असल्याने शिवसेनाही आपले नेटवर्क मजबूत करताना दिसत आहे. दुसरीकडे सर्वच इच्छुक उमेदवारही मतदारसंघात नियमित संपर्क ठेवून आहेत.
युती व जागा वाटपासंदर्भातील निर्णय हा वरिष्ठ स्तरावर होईल. तो दोन्ही पक्षाचे पदाधिकारी मान्य करतीलच. प्रत्येक पक्ष आपले नेटवर्क मजबूत करण्याचा प्रयत्न करतो, त्यानुसार आम्हीही प्रत्येक गावात शिवसेनेचे अस्तित्व निर्माण केले असून, बुथ व वॉर्ड हा निकष ठेवून संघटनेची बांधणी करून सज्जता केली आहे.
नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख शिवसेना.