जिल्ह्यात पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्लू की इतर आजाराने?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:18 IST2021-01-23T04:18:28+5:302021-01-23T04:18:28+5:30

अकोला: मागील १५ दिवसात अनेक पक्ष्यांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात बर्ड फ्लूची धास्ती पसरली आहे. मृत पक्ष्यांच्या चाचणीचे अहवाल ...

Birds die of bird flu or other diseases in the district? | जिल्ह्यात पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्लू की इतर आजाराने?

जिल्ह्यात पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्लू की इतर आजाराने?

अकोला: मागील १५ दिवसात अनेक पक्ष्यांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात बर्ड फ्लूची धास्ती पसरली आहे. मृत पक्ष्यांच्या चाचणीचे अहवाल अद्याप मिळाले नाही. त्यामुळे या पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाला, की इतर आजारांनी हे स्पष्ट झाले नाही. दरम्यान जिल्ह्यात पक्ष्यांचे सीरो सर्वेक्षण करण्यात आले असून त्याचे अहवाल अजून आले नाही. त्यामुळे पक्ष्यांच्या संवर्धनासाठी योग्य निर्णय घेणे शक्य नसल्याने जिल्ह्यात पक्ष्यांवरील संकट कायमच आहे. राज्यातील काही भागात बर्ड फ्लूमुळे पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तसाच प्रकार जिल्ह्यातही घडत असून अनेक भागात एकाच वेळी अनेक पक्षी मृतावस्थेत आढळून येत आहेत. या पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याची शंका उपस्थित करत जिल्ह्यातील अनेक भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान चाचोंडी येथील मृत पक्ष्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने थोडा दिलासा मिळाला होता, मात्र इतर ठिकाणी आढळलेल्या मृत पक्ष्यांचे अहवाल अद्याप प्राप्त झाले नाही. मध्यंतरी अकोला, बार्शिटाकळी, तेल्हारा आणि अकोट तालुक्यातील पाेल्ट्री फॉर्ममधील कोंबड्यांचे सिरो सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणाच्या माध्यमातून २७८ नमुने संकलित करून तपासणीसाठी पुणे येथील रोग अन्वेषण प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्याचे अहवाल अद्याप प्राप्त झाले नाही. त्यामुळे पक्ष्यांना बर्ड फ्लू आहे, की इतर विषाणूजन्य आजार याचे निदान झाले नाही.

पक्ष्यांमध्ये इतरही व्हायरल डिसीजची शक्यता

तज्ज्ञांच्या मते, पक्ष्यांचा मृत्यू हा केवळ बर्ड फ्लूमुळेच होत आहे असे नाही. पक्ष्यांमध्ये इतरही प्रकारचे संसर्गजन्य आजार असू शकतात. यातील प्रामुख्याने पाच प्रकारचे आजार पक्ष्यांसाठी घातक ठरतात. यामध्ये राणीखेत रोग, फाऊल क्वाॅलरा, इकोला इन्फेक्शन, सीआरडी या आजारांचा समावेश आहे. पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या मते फाऊल क्वाॅलरा, इकोला इन्फेक्शन आणि सीआरडी या आजारांमुळेही मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचा मृत्यू होऊ शकतो.

मृत पक्ष्यांच्या चाचणीचे अहवाल अद्याप प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे पक्ष्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळे झाला, असे म्हणता येणार नाही. मात्र, पक्ष्यांमध्ये इतरही आजार आहेत ज्यामुळे पक्ष्यांचा मृत्यू होऊ शकतो. सीरो सर्वेक्षणाच्या अहवालाची प्रतीक्षा असून त्यानंतरच जिल्ह्यात योग्य पाऊल उचलता येणार.

- डॉ. तुषार बावणे, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, अकोला

Web Title: Birds die of bird flu or other diseases in the district?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.