५0 गावांमध्ये गठित होणार जैवविविधता समित्या
By Admin | Updated: June 6, 2014 01:17 IST2014-06-06T00:59:17+5:302014-06-06T01:17:58+5:30
अकोला जिल्हास्तरीय व्यवस्थापन समितीच्या सभेत नियोजन

५0 गावांमध्ये गठित होणार जैवविविधता समित्या
अकोला : प्राणी, पक्षी व वनस्पती प्रजातींच्या नोंदी आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी ग्राम स्तरावर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ५0 गावांमध्ये जैव विविधता समित्या गठित करण्यात येणार आहेत. या संदर्भात गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय जैव विविधता व्यवस्थापन समितीच्या सभेत नियोजन करण्यात आले.
ग्राम स्तरावर जैव विविधता समित्या स्थापन करून, या समित्यांमार्फत संबंधित क्षेत्रातील पशू, पक्षी व विविध प्रकारच्या वनस्पतीबाबतच्या नोंदी घेऊन, संवर्धनाच्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. ग्रामस्तरावर समित्या स्थापन करण्यासाठी पहिल्या टप्प्यात अकोला जिल्ह्यात संरक्षित वन परिसरातील ५0 गावांची प्राधान्याने निवड करून, या गावांमध्ये ग्रामस्तरीय जैव विविधता समित्या स्थापन करण्याचे, जिल्हास्तरीय जैव विविधता व्यवस्थापन समितीच्या सभेत ठरविण्यात आले.
निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय जैव विविधता व्यवस्थापन समितीच्या या सभेला समितीचे सदस्य प्रादेशिक उपवन संरक्षक वसंत धोकटे, उपवन संरक्षक (वन्यजीव) विजय गोडबोले यांच्यासह स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उदय वझे, कौस्तुभ पांढरीपांडे, दीपक जोशी, अमोल सावंत, डॉ.राजा व संबंधित अधिकारी उपस्थित होते.