वर्षभरापासून हजारो ग्राहकांना अॅव्हरेज बिल
By Admin | Updated: June 17, 2017 01:08 IST2017-06-17T01:08:01+5:302017-06-17T01:08:01+5:30
वीज मीटर रिडिंगचा घोळ

वर्षभरापासून हजारो ग्राहकांना अॅव्हरेज बिल
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेड (महावितरण)तर्फे काम पाहणाऱ्या एजन्सीच्यावतीने अकोल्यात वीज मीटर रिडिंगचा आणि बिल वाटपाचा मोठा घोळ सुरू आहे. गेल्या वर्षभरापासून अकोल्यातील हजारो ग्राहकांना अॅव्हरेज बिल दिले जात आहे. मध्यंतरी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मीटर रिडिंग घेतले असता, हा प्रकार समोर आला. त्यामुळे आता अकोल्यातील हजारो ग्राहकांवर वीस ते बावीस हजार रुपये वीज बिल आकारले गेल्याचे धक्कादायक वृत्त आहे.
एप्रिल व मे महिन्यात अकोला शहरातील तिन्ही उपविभागामध्ये वितरित झालेल्या वीज बिलांमध्ये प्रचंड घोळ झाला असून, सहा-सहाशे ग्राहकांचे वीज बिल एकाच ठिकाणाहून काढले जात असल्याचे वृत्त समोर आल्याने चौकशी सुरू झाली आहे. हे प्रकरण चौकशीत असतानाच अॅव्हरेज बिलाचा घोळ नव्याने समोर येत आहे. अकोल्यातील एजन्सीने मीटर रिडिंग व्यवस्थित केले नाही म्हणून वीज कंपनीने लाइनमन आणि इतर कर्मचाऱ्यांना त्या कामी लावले.
या क्रॉस चेकींगमध्ये अकोल्यातील सात हजार ग्राहकांना वर्षभरापासून अॅव्हरेज बिल दिले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या सात हजार ग्राहकांना आता मागिल महिन्याचे मिळून असे वीस-बावीस हजार बिल आकारले गेले आहे. अचानक एवढे बिल आल्याने अकोलेकरांना जबर धक्का बसला असून, आता हे ग्राहक वीज कंपनीच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहेत.
व्यवस्थापकीय संचालकांच्या आदेशाची अवहेलना!
नियमानुसार, ज्या ग्राहकांचे वीज मीटर बंद असेल त्यांना तातडीने नोटिस दिली गेली पाहिजे. वेळप्रसंगी त्यांचे मीटर बदलून दिले पाहिजे. जर असे होत नसेल तर याप्रकरणी वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई का करण्यात येऊ नये, असे आदेश व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी दिले आहेत; मात्र या आदेशाची अकोल्यात अवहेलना होत आहे.
फ्लॅश मीटर फास्टच्या तक्रारी
मध्यंतरी ३०७ ते ३३० या सात डिजीटचे फ्लॅश डिजिटल मीटर अकोला शहरात मोठ्या प्रमाणात लावले गेलेत; मात्र काही दिवसांतच याप्रकरणी या मीटरच्या तक्रारी आल्यात. कंपनीने याबाबत शोध घेतला असता, फ्लॅश मीटर फास्ट फिरत असल्याचे समोर आले. त्यामुळे ज्या ग्राहकांनी तक्रारी केल्यात त्यांचे फ्लॅश मीटर बदलून दिले गेले; मात्र ज्यांनी तक्रारी केल्या नाहीत, त्यांचे मीटर अजूनही बदलले गेले नाहीत.