सैबेरियाच्या लालसरी बदकांच्या आगमनाने कापशी तलावाचे सौंदर्य खुलले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 13:10 IST2018-11-23T13:07:46+5:302018-11-23T13:10:29+5:30
अकोला: भारताचा निसर्ग हा विविधतेने नटलेला आहे. अनेक विदेशी पाहुणे भारतभेटीवर येतात. नव्हे, तर त्यांना भारतभेटीची ओढच लागते. हे विदेशी पाहुणे दुसरे-तिसरे कोणी नसून, सैबेरियातील लालसरी बदके आहेत. थं

सैबेरियाच्या लालसरी बदकांच्या आगमनाने कापशी तलावाचे सौंदर्य खुलले!
अकोला: भारताचा निसर्ग हा विविधतेने नटलेला आहे. अनेक विदेशी पाहुणे भारतभेटीवर येतात. नव्हे, तर त्यांना भारतभेटीची ओढच लागते. हे विदेशी पाहुणे दुसरे-तिसरे कोणी नसून, सैबेरियातील लालसरी बदके आहेत. थंडीची चाहूल लागताच, ही बदके कित्येक मैलांचा प्रवास करीत कापशी तलावावर दाखल झाले आहेत. त्यांच्या जलसंचाराने कापशी तलावाचे सौंदर्य अधिकच खुलले आहे.
नोव्हेंबर महिना म्हटला, की गुलाबी थंडीची चाहूल लागते. ऊबदार कपडे, चवीला हिरवागार हुरडा, हरभरा, बाजरीच्या भाकरींची आठवण या गुलाबी थंडीत निश्चितच येते. थंडीची जशी चाहूल लागते, तशीच चाहूल निसर्ग, पक्षीप्रेमींनी लालसरी बदकांच्या आगमनाची लागते. जिल्ह्यातील कापशी तलाव विदेशी पक्ष्यांसाठी नंदनवनच. या नंदनवनात दाखल होण्यासाठी संकटांचा सामना करीत, हजारो मैलांचा प्रवास करीत म्हणजे सैबेरिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान मार्गे भारतात दाखल होतात आणि ऐन थंडीच्या भरात लालसरी बदक कापशी तलावाचा घरोबा करतात. सध्या हे विदेशी पाहुणे कापशी तलावावर येऊन दाखल झाले आहेत. पक्षिमित्र दीपक जोशी आणि देवेंद्र तेलकर हे चार दिवसांपासून अकोला शहर आणि पंचक्रोशीतील जलाशयांवर पक्षी दर्शनासाठी आवर्जून भेटी देत आहेत; परंतु भेटीदरम्यान त्यांना इतर तलावांवर पाहुण्यांची चाहूल लागली नाही; मात्र कापशी तलावावर त्यांना विदेशी लालसरी बदके दिसून आल्याने त्यांच्या आनंदात भर पडली. या विदेशी पक्ष्यांचे सौंदर्य तर देखणेच आहेच. शिवाय, त्यांच्या सौंदर्याने कापशी तलावाचे सौंदर्यसुद्धा खुलले आहे. निसर्गप्रेमींना या विदेशी पाहुण्यांचे सौंदर्य अनुभवण्याची उत्तम संधी चालून आली आहे. (प्रतिनिधी)
लालसरी बदके हे सैबेरियाहून, अफगाणिस्तान, पाकिस्तान मार्गे भारतात दाखल होऊन कापशी तलावावर येतात. ही अकोलेकरांसाठी अभिमानाची बाब आहे. डपिंग डकसच्या जातीची ही बदके असून, कापशी तलावरील त्यांची उपस्थिती मनाला सुखावून जाते. त्यामुळे अकोलेकरांना त्यांच्या निरीक्षणाची दुर्मिळ संधी आहे.
-दीपक जोशी, पक्षीमित्र