लोकसहभागातून प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सुशोभीकरण
By Admin | Updated: August 23, 2014 22:08 IST2014-08-23T22:08:52+5:302014-08-23T22:08:52+5:30
कायापालट योजना : दोन टप्प्यात राबविणार

लोकसहभागातून प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सुशोभीकरण
बुलडाणा : लोकसहभागातून प्राथमिक आरोग्य केंद्राचे सुशोभीकरण करण्याची आरोग्य विभागातर्गंत कायापालट योजना राज्यभर राबवली जाणार आहे. याबाबत आरोग्य सचिवांनी सर्व जिल्हा परिषदांना लेखी सुचना देत पश्चिम महाराष्ट्रातील मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देण्याचे आदेश दिले आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्राची दूरवस्था दूर करून गावागावात आरोग्य मंदीर म्हणून उभे करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेने आरोग्य केंद्रांच्या सौंदर्यीकरणासाठी कायापालट योजना राबवण्याचा निर्णय डिसेंबर २0१३ मध्ये घेतला होता. दोन टप्प्यात ही योजना राबवण्याचा अँक्शन प्लॅनही तयार करण्यात आला. हा प्लॅन एकून दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य विभागाने जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांसह ग्रामपंचायती व तालुकास्तरीय अधिकार्यांना विश्वासात घेऊन त्यांच्यामार्फत आरोग्य केंद्राच्या सुशोभीकर करण्यात येणार आहे.
** असे होणार सुशोभीकरण
लोकसहभागाच्या माध्यमातून खासगी दवाखान्यांना लाजवेल असे आरोग्य केंद्र करण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रवेशद्वार व्यवस्थित बसवून घेण्याबरोबरच आरोग्य केंद्राच्या सभोवती बागबगीचा तयार करणे. आरोग्य केंद्रात प्रवेश केल्यानंतर वेटींग रूम, टीव्ही आणि म्यूझीक सिस्टीमसह आरामदायी बैठक व्यवस्था तयार करणे, केंद्रात रूग्णासाठी स्वच्छ बेड, गरम पाणी उपलब्ध करणे तसेच आरोग्य विभागामार्फत राबवल्या जाणार्या शासकीय योजनांचे माहिती फलकही आरोग्य केंद्रात लावणे.
** वैद्यकीय अधिकार्यांचा अभ्यास दौरा
कायापालट योजनेअंतर्गंत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्यांचा पश्चिम महाराष्ट्रातील मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देण्यासाठी अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. त्यानुसार बुलडाणा जिल्ह्यातील १३ प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यातील मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्रास भेटी दिल्या आहेत.