बेमुदत उपोषणाला बसणार
By Admin | Updated: September 7, 2014 23:56 IST2014-09-07T23:56:05+5:302014-09-07T23:56:05+5:30
चतारी ते चतारी फाटा रस्त्याची दुदर्शा; जि.प.बांधकाम विभागाचे दुर्लक्ष.

बेमुदत उपोषणाला बसणार
खेट्री : नजीकच्या चतारी ते चतारी फाटा रस्त्याची दुरुस्ती करण्याकडे जि.प.बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे सोमवार, ८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता चतारी ते चतारी फाटा रस्त्यावर खड्डय़ात बसून बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते गणेश वासुदेव हिरळकर यांनी कार्यकारी अभियंता जि.प.बांधकाम विभाग अकोला यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.
चतारी ते चतारी फाटा या २ कि.मी.लांबीच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने नागरिकांची कमालीची गैरसोय होत आहे. पातूर तालुक्यात पातूरचे ग्रामीण रुग्णालय हेच चतारी परिसरातील लोकांना जवळ पडते. ग्रामीण रुग्णालयातील रुग्णास तातडीने अकोला येथे उपचारासाठी हलवावे लागल्यास याच मार्गाने न्यावे लागते. चतारीच्या लोकांना आठवडीबाजाराकरिता चान्नी येथे तर चतारी, खेट्री, शिरपूर, चांगेफळ येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वाडेगाव व चान्नी येथे ये-जा करावी लागते. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. या खड्डय़ांमुळे अनेकदा किरकोळ अपघात झाले आहेत. एखादा मोठा अपघात होऊन त्यात प्राणहानी होण्याची शक्यता आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वारंवार निवेदने देऊनही दुरुस्ती करण्यात आली नसल्यामुळे हिवरकर यांनी सोमवार, ८ सप्टेंबर रोजी सदर रस्त्यावरील खड्डयात उपोषणास बसण्याची भूमिका घेतली आहे.