जिल्ह्यातील केळी निर्यातीसाठी प्रयत्न!
By Admin | Updated: May 31, 2017 02:18 IST2017-05-31T02:18:03+5:302017-05-31T02:18:03+5:30
शेतकरी, अधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही

जिल्ह्यातील केळी निर्यातीसाठी प्रयत्न!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: जिल्ह्यातील केळी विदेशात निर्यात करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून, निर्यातदारांना प्रशासनामार्फत सहकार्य करण्यात येणार आहे, अशी ग्वाही जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी केळी उत्पादक शेतकरी आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्ह्यातील अकोट व तेल्हारा तालुक्यातील केळी निर्यातदार शेतकरी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यातील अकोट व तेल्हारा तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन होते. त्यानुषंगाने शेतकऱ्यांच्या हितासाठी दोन्ही तालुक्यातील केळी विदेशात निर्यात करण्याच्या विषयावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीच्या प्रारंभी महाबीजचे महाव्यवस्थापक अशोक अमानकर यांनी जिल्ह्यातील केळी उत्पादनासाठी असलेल्या अनुकूल बाबी, केळीचा दर्जा, शेतकऱ्यांच्या अपेक्षा आणि शासनाची भूमिका यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. जिल्ह्यातील केळीच्या निर्यातीसाठी प्रशासन सकात्मक असून, त्यासाठी शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यात येणार आहे. तसेच केळी पिकाच्या करार शेतीसाठी शेतकऱ्यांची मते जाणून घेण्यात येतील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. या बैठकीला प्रामुख्याने महाबीजचे महाव्यवस्थापक अशोक अमानकर, अपेडाचे महाव्यवस्थापक प्रशांत वाघमारे, अकोटचे उपविभागीय अधिकारी उदय राजपूत, महाबीजचे गुणवत्ता व नियंत्रण विभागाचे प्रफुल्ल लहाने, कृषी समन्वयित प्रकल्प व्यवस्थापक सतीश गद्रे, कृषी व्यवसाय तज्ज्ञ राहुल ठाकरे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक सुरेश बावीस्कर, कृषी विकास अधिकारी हनुमंत ममदे यांच्यासह निर्यातदार, शेतकरी व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. केळीची निर्यात, शेती करार व केळी पिकाचा दर्जा यासंदर्भात निर्यातदारांनी यावेळी सविस्तर माहिती दिली.
बियाणे, खते साठेबाजांवर कारवाई करा!
खरीप हंगामासाठी जिल्ह्यात बियाणे, खते व कीटकनाशकांची मागणी, त्या तुलनेत झालेला पुरवठा व वितरणाचा आढावा घेत, बियाणे खतांचा अनधिकृत साठा करणाऱ्या साठेबाजांवर कृषी विभागाच्या भरारी पथकांनी धाडी टाकून कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी कृषी विभागाला यावेळी दिले.
प्रस्ताव सादर करा; अंतिम निर्णय जूनमध्ये!
निर्यातदारांनी अकोट व तेल्हारा तालुक्यात सर्व्हे करून केळी उत्पादक शेतकऱ्यांची मते जाणून घ्यावी, तसेच प्रशासनाकडून अपेक्षा व सहकार्य याबाबतचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देत, सर्व्हेसाठी आत्मा अंतर्गत शेतकरी मित्रांचे सहकार्य घेऊन प्रस्ताव सादर करावा. या प्रस्तावावर जून महिन्यात अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी स्पष्ट केले. कृषी विभाग, महाबीज, आत्मा व डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी केळी निर्यातीबाबत नियोजन कसे असावे, याबाबत माहिती सादर करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.