येस बँकेवर निर्बंध; धनादेश वटण्यास अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 13:50 IST2020-03-07T13:50:03+5:302020-03-07T13:50:13+5:30
अकोला जनता, अकोला अर्बन आणि अकोला जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचा समावेश आहे.

येस बँकेवर निर्बंध; धनादेश वटण्यास अडचणी
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : येस बँकेत देशातील तीनशे पन्नासच्यावर सहकारी व इतर बँकांचे धनादेश वटविल्या जातात; (चेक क्लीअरन्स) परंतु रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध घातल्याने येस बँकेकडे वटविण्यासाठी टाकण्यात आलेल्या सहकारी बँकांच्या ग्राहकांचे धनादेश रखडल्याचे वृत्त आहे. यात अकोला जनता, अकोला अर्बन आणि अकोला जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचा समावेश आहे.
नॅशनल पेमेंट कार्पोरेशन आॅफ इंडियासोबत करार केल्यामुळे देशातील जवळपास दीडशेच्यावर सहकारी बँकांनी त्यांच्या ग्राहकांचे धनादेश वटविण्यासाठीच्या व्यवहारासाठी (क्लीअरन्स सेटलमेंट) येस बँकेची सेवा घेतली आहे. त्यामुळे बँकेकडे येणारे ग्राहकांचे धनादेश येस बँकेक डे पाठविण्यात येतात. हा आंतरबँकिंग व्यवसाय असल्याचे वृत्त आहे. येस बँक ही क्लीअरिंग हाउस म्हणून सहकारी बँकांचे धनादेश क्लीअर करण्याचे काम करीत आहे. तथापि, रिझर्व्ह बँकेने या बँकेवर एका निर्देशान्वये धनादेश वटविण्यासाठीचे निर्बंध घातले आहेत. त्यामुळे ज्या ग्राहकांनी त्यांचे धनादेश वटविण्यासाठी पाठविले; परंतु वटले नाहीत. या संदर्भात अकोला जनता बँकेची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.
आमच्या ग्राहकांचे धनादेश वटविण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. व्यवस्थापन त्यादृष्टीने काळजी घेत आहे. यात आमच्या ग्राहकांचे कोणतेही नुकसान होणार नाही. त्यामुळे ग्राहकांनी घाबरू नये.
- अनंत वैद्य,
मुख्य कार्यकारी अधिकारी,
अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, अकोला.
सर्व धनादेश वटविण्याचे काम दोन दिवसांत नियमित होईल. तसे पत्रही रिझर्व्ह बँकेने दिले आहे. त्यामुळे ग्राहकांनी घाबरू न जाऊ नये, तसेही येस बँक दोन दिवसांत स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये समाविष्ट होण्याची शक्यता आहे.
- शंतनू जोशी,
सीईओ, अकोला अर्बन बँक.