बाप्पांचे आज आगमन
By Admin | Updated: August 29, 2014 01:44 IST2014-08-29T01:33:47+5:302014-08-29T01:44:07+5:30
स्वागतासाठी राजराजेश्वर नगरी सज्ज, भक्तांच्या उत्साहाला उधाण

बाप्पांचे आज आगमन
अकोला : संपूर्ण राज्यात हर्षोल्हासात साजरा करण्यात येणार्या गणेशोत्सवाला शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची तयारी पूर्ण झाली असून, घरोघरीही श्रींच्या स्थापनेची तयारी करण्यात आली आहे. बहुरंगी मूर्ती खरेदी करण्यासाठी अकोला क्रिकेट क्लब व भारत विद्यालयाच्या मैदानावर गुरुवारी रात्री उशिरापर्यंत गर्दी होती. भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
गणेश चतुर्थीनिमित्त बाप्पांचे घरोघरी आगमन होत आहे. लहानांपासून ते आबालवृद्धांपर्यंत प्रत्येकजण स्वागताच्या तयारीत व्यस्त आहे. गणेश मंडळांद्वारा शहरात ठिकठिकाणी बाप्पांच्या स्थापनेची तयारी करण्यात आली आहे. गणपतीबाप्पाला घरी नेण्यासाठी अकोला क्रिकेट क्लब व भारत विद्यालयातील मैदानावर गणेश मूर्ती विक्रीच्या स्टॉलवर गुरुवारी भक्तांनी गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत गणेश मूर्ती खरेदीसाठी भाविक बाजारात येऊन वाजतगाजत बाप्पांना घरी घेऊन जात होते. या ठिकाणी विविध आकर्षक मूर्तीं विक्रीसाठी आहेत. यावर्षी गणेश मूर्तींचे भाव वाढले असले तरी भक्तांचा उत्साह मात्र कायम आहे. त्यामुळे मूर्ती विक्रीवर कोणताही प्रभाव पडला नसल्याचे मूर्ती विक्रेत्यांनी सांगितले. काही सार्वजनिक गणेश मंडळांनीही ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत गणेशाची मूर्तीं नेल्या. घरघरी बाप्पाच्या स्वागतासाठी शुक्रवारी भक्तांची मूर्ती खरेदीकरिता गर्दी उसळणार असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्तेही शुक्रवारीच मिरवणूक काढून बाप्पाला वाजतगाजत मंडपात विराजमान करतील.