BabaSaheb Ambedkar attends first conference of Wharad Provincial Scheduled Cast Federation in Akola | वऱ्हाड प्रांतिक शेडुल्ड कास्ट फेडरेशनच्या पहिल्या परिषदेला होती बाबासाहेबांची उपस्थिती
वऱ्हाड प्रांतिक शेडुल्ड कास्ट फेडरेशनच्या पहिल्या परिषदेला होती बाबासाहेबांची उपस्थिती

ठळक मुद्देअकोला स्टेशनपासून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली होती. ५.३० वाजता बाबासाहेबांचे अधिवेशन मंडपात आगमन झाले. वºहाड प्रांतातील जनतेतर्फे बाबासाहेबांना देण्यात आलेले मानपत्र वाचून दाखविले.


अकोला: वऱ्हाड प्रांतिक शेडुल्ड कास्ट फेडरेशनच्या विद्यमाने पहिली परिषद अकोला येथे ९ व १० डिसेंबर १९४५ रोजी भरली होती. परिषदेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वत: उपस्थित होते. परिषदेला अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, अकोला व मध्य प्रांतातून शेकडो प्रतिनिधी उपस्थित होते. जवळपास ७० ते ७५ हजार लोक परिषदेला उपस्थित होते. अकोला येथे बाबासाहेबांचे प्रथमच आगमन होणार असल्याने वºहाड प्रांतातील जनता बाबासाहेबांच्या दर्शनासाठी व त्यांचा संदेश ऐकण्यासाठी आली होते. बाबासाहेबांच्या आगमनाची जाहिरात विस्तृत प्रमाणावर खूप आधीपासून करण्यात आली होती.
अकोला स्टेशनपासून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली होती. या मिरवणुकीची लांबी ३ ते ४ फर्लांग होती. अकोला स्टेशन रोड ते टिळक मैदान (आताचे शास्त्री स्टेडियम)पर्यंतचा रस्ता माणसांनी फुलून गेला होता. मिरवणुकीत अखिल भारतीय शेडुल्ड कास्ट फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी पी.एन. भोजराज, भारतीय संस्थानिक शे. का. फे. अध्यक्ष सुबय्या, म्युनिसिपल कामगार परिषदेचे नियोजित अध्यक्ष सज्जनसिंग आणि शांताबाई दाणी, नाशिक प्रामुख्याने दिसत होते. वºहाड प्रांतातील, जिल्ह्यातील समता सैनिक दलाने उत्तम शिस्त सांभाळली होती. दुतर्फी समता सैनिक दल, मधोमध पुढाऱ्यांच्या मोटारी, महिला वर्ग व इतर जनसमूह आणि सर्वांच्या पुढे नानाविध वाद्यांचे ताफे, मर्दानी दांडपट्ट्यांचे खेळ व बँड अशा उत्साही थाटात व बाबासाहेबांच्या जयघोषात मिरवणूक चालली होती. अशा अपूर्व सोहळ्यात मिरवणूक साध्वी रमाबाई नगरात विसर्जन झाली. सुबय्या यांच्या हस्ते झेंडावंदनाचा कार्यक्रम झाला. अध्यक्षांनी उभारलेला निळा ध्वज उंचावर जाऊन फडकल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला व फेडरेशनचा जयघोष करण्यात आला. सुबय्या यांच्या अध्यक्षतेखाली समता सैनिक दलाच्या परिषदेचे कार्य पार पाडण्यात आले. त्यानंतर लगेच महिला परिषद शांताबाई दाणी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. ५.३० वाजता बाबासाहेबांचे अधिवेशन मंडपात आगमन झाले. परिषदेची सुरुवात ६.४५ वाजता नागपूरच्या शेंदरे वकिलांच्या गायनाने झाली.
स्वागताध्यक्ष डी.झेड. पळसपगार यांनी जमलेल्या मंडळी आणि बाबासाहेबांचे स्वागत केले. अकर्ते वकील, अम्रुतकर वकील, म्यु. कमिटीचे अध्यक्ष रावबहादूर आठल्ये, मुस्लीम लीगचे सभासद काझी वकील यांची भाषणे झाली. इंगळे यांनी अखिल वºहाड प्रांतातील जनतेतर्फे बाबासाहेबांना देण्यात आलेले मानपत्र वाचून दाखविले. बाबासाहेबांना १,१०१ रुपयांची थैली अर्पण करण्यात आली. नंतर बाबासाहेबांनी भाषण दिले, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी दिली.

Web Title: BabaSaheb Ambedkar attends first conference of Wharad Provincial Scheduled Cast Federation in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.