अकोल्यात जागरूक मतदार चषक क्रिकेट स्पर्धा: जिल्हाधिकारी कार्यालय संघाची विजयी सलामी
By Atul.jaiswal | Updated: February 6, 2018 18:36 IST2018-02-06T18:29:53+5:302018-02-06T18:36:30+5:30
अकोला: मतदारांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी आयोजित केलेल्या जागरूक मतदार चषक क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या हस्ते क्रीडा ज्योत पेटवून मंगळवारी सकाळी ८ वाजता जिमखाना क्रिकेट क्लब मोठी उमरी येथे करण्यात आला.

अकोल्यात जागरूक मतदार चषक क्रिकेट स्पर्धा: जिल्हाधिकारी कार्यालय संघाची विजयी सलामी
अकोला: मतदारांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी आयोजित केलेल्या जागरूक मतदार चषक क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या हस्ते क्रीडा ज्योत पेटवून मंगळवारी सकाळी ८ वाजता जिमखाना क्रिकेट क्लब मोठी उमरी येथे करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र निकम, उपसंचालक सामाजिक वनीकरण विजय माने, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, राज्य परिवहन महामंडळाचे पलंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जागरूक मतदार चषक क्रिकेट सामन्यांचा पहिला सामना जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या नेतृत्वाखालील जिल्हाधिकारी कार्यालय व परिवहन अधिकारी पलंगे यांच्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या दरम्यान खेळला गेला. नाणे फेक जिंकून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या संघाने प्रथम फलंदाजी केली. त्यांनी सर्व बाद ९७ धावा काढल्या. जिल्हाधिकारी संघातर्फे सिद्दू जंजाळ, वैभव फरतारे, सुबोध गावंडे यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. जिल्हाधिकारी संघातर्फे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामुर्ती, जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राकेश कलासागर यांनी उत्कृष्ठ क्षेत्र रक्षण केले. जिल्हाधिकारी कार्यालय संघाकडून आस्तिक कुमार पाण्डेय व नितीन शिंदे यांनी डावाची सुरूवात केली. जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी जलद गतीने फलंदाजी करून दोन षटकार व ९ चौकारासह नाबाद ६० धावा चोपल्या. नितीन शिंदे यांनी २८ धावा केल्या. हा सामना जिल्हाधिकारी कार्यालय संघाने ९ गडी राखत जिंकला. सामनावीर म्हणून जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांना घोषित करण्यात आले.सामन्यांचे पंच म्हणून चन्नकेशला व सावकर हे होते.
जिल्हाधिकाऱ्यांची आकर्षक खेळी
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ठेवलेले ९७ धावांचे लक्ष्य जिल्हाधिकारी कार्यालय संघाने एक गडी गमावून सहज गाठले. यामध्ये कर्णधार जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांचा मोलाचा वाटा राहिला. जिल्हाधिकाºयांनी दोन षटकार व ९ चौकारासह नाबाद ६० धावांची नाबाद खेळी केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आकर्षक खेळीने उपस्थितांची मने जिंकली.
१२ संघांचा सहभाग
६ ते १२ फेब्रुवारी या कालावधीत होणार असलेल्या जागरूक मतदार क्रिकेट चषक स्पर्धेत १२ संघांनी भाग घेतला आहे. यात जिल्हाधिकारी कार्यालय, महसुल विभाग, पोलीस विभाग, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य परिवहन विभाग, विधीज्ञ अकोला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , कार्यकारी अभियंता महावितरण, कृषी विभाग, जलसंपदा विभाग, पत्रकार संघ यांचा समावेश आहे.