Auto drivers, keep traffic flowing! | ऑटो चालकांनो, वाहतूक सुरळीत ठेवा!
ऑटो चालकांनो, वाहतूक सुरळीत ठेवा!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहरातील रस्त्यांचे तसेच उड्डाणपुलाच्या निर्माणाधीन बांधकामामुळे वाहतुकीला प्रचंड अडथळे निर्माण होत असतानाच ऑटो   चालकही रस्त्यात वाहने उभी करून कोंडी निर्माण करीत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच वाहतूक शाखेचे प्रमुख गजानन शेळके यांनी ऑटो   चालकांची शनिवारी बैठक घेऊन वाहतूकसुरळीत ठेवण्याचे निर्देश दिले. यापुढे रस्त्याध्ये ऑटो   दिसल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी या बैठकीत दिला.
वाहतूक नियमन व दंडात्मक कार्यवाही करून शहरातील वाहतुकीचा प्रश्न सुटणार नाही, हे लक्षात घेऊन वाहतूक शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी शहरातील अशोक वाटिका ते टॉवर चौक रोडवरील ऑटो   चालकांची शनिवारी बैठक घेतली. या बैठकीत ऑटो   चालकांना वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या सूचना केल्या. वाहतूक सुरळीत ठेवण्याकामी सहकार्य करण्याचे आवाहन शेळके यांनी केले. शहरात एकाच वेळी सर्व प्रमुख रस्त्यांचे बांधकाम सुरू असल्याने व वाहतुकीसाठी अरुंद रोड राहिले आहेत.
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांना दररोज खूप धावपळ करावी लागते; परंतु रोडच्या क्षमतेच्या किती तरी जास्त वाहने रोडवर धावत असल्याने व त्यामध्ये ऑटो  संख्या लक्षणीय असल्याने वाहतूक पोलिसांनी कितीही प्रयत्न केला तरीही वाहतूक अधून-मधून खोळंबत असल्याचे दिसून येते. दिवसभर मेहनत घेऊनही वाहतूक पोलिसांना टीका सहन करावी लागत असल्याने वाहतूक शाखेने ऑटो   चालकांची बैठक घेऊन त्यांना उपाययोजना करणे तसेच आवश्यक त्या सूचना केल्या. विशेषकरून अशोक वाटिका ते रेल्वे स्टेशन या प्रमुख मार्गावर बसस्थानक, रेल्वे स्टेशन, न्यायालय तसेच प्रमुख कार्यालये असल्याने वाहतुकीची प्रचंड वर्दळ दिवसभर राहते. याच मार्गावर हजारो ऑटो   धावत असल्याने वाहतूक विस्कळीत होत असल्याने सहकार्य करण्याचे आवाहन वाहतूक शाखेच्यावतीने करण्यात आले आहे.

Web Title: Auto drivers, keep traffic flowing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.