बसस्थानकावर होतो लिलाव; प्रवासी लावतो बोली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 15:26 IST2019-06-23T15:26:13+5:302019-06-23T15:26:21+5:30
बसस्थानकावर होणाऱ्या लिलावात बसस्थानकावर जमलेले प्रवासी बोली लावतात. अंतिम बोलीत टिकलेल्या व्यक्तीच्या (प्रवाशाच्या) स्वाधीन संबंधित वस्तू केली जाते.

बसस्थानकावर होतो लिलाव; प्रवासी लावतो बोली
- संजय खांडेकर
अकोला : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रत्येक डेपोवर अधून-मधून जाहीर लिलाव होत असतो; मात्र या लिलावाची माहिती किती जणांना आहे, कुणास ठाऊक; पण ही पद्धत न्यायिक आणि लोकाभिमुखासोबतचं स्वागतार्हच म्हणावी लागेल. बसस्थानकावर होणाऱ्या लिलावात बसस्थानकावर जमलेले प्रवासी बोली लावतात. अंतिम बोलीत टिकलेल्या व्यक्तीच्या (प्रवाशाच्या) स्वाधीन संबंधित वस्तू केली जाते.
महामंडळाच्या बसगाड्यांमध्ये दररोज लाखो लोक प्रवास करीत असतात. प्रवास करीत असताना, कुणी बॅग, सुटकेस, विविध साहित्य, छत्री, दागिने, घड्याळ, कपडे आणि वस्तू विसरून जातात. अनेकजण हरविलेल्या वस्तूंचा शोध घेतात, तर काही घेत नाहीत. मग, या वस्तू या बसगाडीचे वाहक थेट संबंधित डेपोत जमा करतात. डेपोत या बॅगमधील प्रत्येक वस्तूंची बारीकसारीक नोंद कागदावर घेतली जाते आणि ती बॅग, वस्तू डेपोत पेटीबंद होते. त्यानंतर काही कालावधीत या सर्व वस्तू बसस्थानकावर मांडून त्यांचा जाहीर लिलाव केला जातो. याप्रसंगी एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित असतात.
काय आहे हा प्रकार ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या हजारो बसगाड्या राज्य आणि राज्याच्या बाहेर दररोज ये-जा करीत असतात. या बसगाड्यांमध्ये अनेकदा प्रवासी आपले साहित्य, बॅग, वस्तू विसरून जातात. बेवारस म्हणून बसमध्ये सापडलेल्या या वस्तूंची नियमानुसार नोंद केली जाते. त्यानंतर महामंडळाचे अधिकारी वरिष्ठांसमोर या वस्तूंचा जाहीरपणे लिलाव करतात. त्या वस्तूंची विल्हेवाट लावली जाते. लिलावातून गोळा झालेली रक्कम एसटी महामंडळाच्या महसुलात जमा केली जाते.
दंड भरून मिळू शकते वस्तू
महामंडळाच्या बसगाडीत प्रवास करीत असताना जर बॅग किंवा काही वस्तू हरविली तर प्रवासादरम्यानच्या डेपोत जाऊन चौकशी केली पाहिजे. प्रत्येक डेपोत एक सामान पेटी ठेवलेली असते. ओळख पटवून ही वस्तू मिळविता येते; मात्र त्यासाठी नाममात्र दंड भरावा लागतो.