खेट्री : पातूर तालुक्यातील पांढुर्णा येथील पत्रकार अमोल सोनोने यांच्यावर रेतीमाफियांनी हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीनही आरोपींचा जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने गुरुवारी नाकारला.
पांढुर्णा येथील पत्रकार अमोल सोनोने यांनी अंधारसांगवी परिसरातील निर्गुणा नदीपात्रातून रेतीचे उत्खनन करून अवैध वाहतूक सुरू असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये १७ जानेवारी रोजीच्या अंकात प्रकाशित करताच परिसरातील रेतीमाफियांचे पित्त खवळले. त्यानंतर १८ जानेवारी रोजी पत्रकार अमोल सोनोने यांच्यावर हल्ला करीत जखमी केले. पत्रकार सोनोने यांनी चान्नी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आलेगाव येथील आरोपी सचिन करपे, रामेश्वर डाखोरे, आकाश मुळे, या तिघांविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्ट व भादंविच्या ३२४, ५०६, ५०४, व ३४,कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. आरोपींना १९ जानेवारी रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तिघेही आरोपी न्यायालयीन कोठडीत असताना तिघांनी जामीन याचिका दाखल केली. त्यावर २१ जानेवारी रोजी सुनावणी करून तिघे आरोपींचा जामीन जिल्हा व सत्र न्यायालयाने नाकारला असून, पुन्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
वाळू तस्करीचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश
२०१४ ते २०२० दरम्यान राज्यात २०० पत्रकारांवर हल्ले झाले आहे. त्यामध्ये अनेकांनी आपले प्राण गमावले, त्यामुळे वाळू तस्करीचा व पत्रकार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा आदेश न्यायालयाने पोलिसांना दिला आहे.