तोकड्या मानधनात ‘आशा’ बिनपगारी-फुल अधिकारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 12:22 PM2019-03-10T12:22:53+5:302019-03-10T12:24:09+5:30

अकोला: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य विभागाच्या विविध योजनांचे काम करणाऱ्या जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांना कामाच्या मोबदल्यात दरमहा मिळणारे तोकडे मानधन बघता, बिनपगारी अन् फुल अधिकारी अशीच अवस्था आशा स्वयंसेविकांची झाल्याचा प्रत्यय येत आहे.

'Asha' workers get low honororium | तोकड्या मानधनात ‘आशा’ बिनपगारी-फुल अधिकारी!

तोकड्या मानधनात ‘आशा’ बिनपगारी-फुल अधिकारी!

Next

- संतोष येलकर
अकोला: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य विभागाच्या विविध योजनांचे काम करणाऱ्या जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांना कामाच्या मोबदल्यात दरमहा मिळणारे तोकडे मानधन बघता, बिनपगारी अन् फुल अधिकारी अशीच अवस्था आशा स्वयंसेविकांची झाल्याचा प्रत्यय येत आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची ग्रामीण आणि शहरी भागात प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामात आशा स्वयंसेविकांची मदत महत्त्वपूर्ण ठरत आहे. जिल्ह्यात कार्यरत आशा स्वयंसेविकांना जननी सुरक्षा योजना, कुटुंब नियोजन साधनांचे वाटप, हिवताप समूळ उपचार, कुष्ठरोग औषधोपचार, क्षयरोग औषधोपचार, विविध प्रकारचे लसीकरण आणि सर्वेक्षणासह ४८ प्रकारची कामे करावी लागतात. काम भरपूर करावे लागत असले, तरी कामाच्या मोबदल्यात दरमहा ५०० रुपये मानधन आणि विविध भत्त्यांसह १ हजार ५०० ते २ हजार रुपयांपर्यंत एकूण मानधन मिळते. आरोग्यविषयक कामांसाठी पायपीट करणाºया आशा स्वयंसेविकांना दरमहा मिळणाºया तोकड्या मानधनात संसाराचा गाडा हाकावा लागत आहे. त्यामुळे तुटपुंजा मानधनात आशा स्वयंसेविकांची गत बिनपगारी आणि फुल अधिकारी अशीच झाल्याचा प्रत्यय येत आहे.

जिल्ह्यात कार्यरत अशा आहेत ‘आशा’!
जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील ग्रामीण भागात १ हजार २७५ आणि अकोला महानगरपालिका क्षेत्रात १८० अशा जिल्ह्यात एकूण १ हजार ४५५ आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत.

असे मिळते मानधन!
आशा स्वयंसेविकांना दरमहा निश्चित स्वरूपात ५०० रुपये मानधन, रेकॉर्ड मेंटनन्स ५०० रुपये, बचत गटांची बैठक घेतल्यास ४० रुपये, किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन केल्यास ४० रुपये, महिलांची बैठक घेऊन मार्गदर्शन केल्यास ४० रुपये, ग्रामसभेला उपस्थित राहुल आरोग्यविषयक मार्गदर्शन केल्यास ५० रुपये अशा प्रकारचे मानधन आशा स्वयंसेविकांना दिले जाते.

मीठ वापराच्या तपासणीसाठी प्रतिघर एक रुपया!
गावात घरोघरी फिरून आयोडीनयुक्त मीठ वापरासंदर्भात तपासणी केल्यास आशा स्वयंसेविकांना प्रतिघर एक रुपया याप्रमाणे मानधन देण्यात येत आहे.

शेतमजुरीचे करावे लागते काम!
आशा स्वयंसेविकांना कामाच्या मोबदल्यात दरमहा मिळणारे मानधन अत्यंत तोकडे असल्याने, संसाराचा गाडा चालविण्यासाठी अनेकदा आशा स्वयंसेविकांना शेतमजुरीचे काम करावे लागते.
तोकड्या मानधनात ‘आशा’ बिनपगारी फुल अधिकारी!

राबराब राबून कामाचा मिळणारा मोबदला अत्यंत कमी मिळतो. दरमहा १ हजार ५०० ते २ हजार रुपये मानधन मिळते. त्यामध्ये संसाराचा गाडा चालविणे शक्य नसल्याने, आशा स्वयंसेविकेचे काम करून शेतमजुरीचे काम करावे लागते. त्यामुळे बिनपगारी आणि फुल अधिकारी अशी आमची अवस्था आहे.
-प्रमिला गजानन डाबेराव
आशा स्वयंसेविका, जऊळखेड, ता. अकोट.

पाच हजार लोकसंख्येच्या क्षेत्रात एका आशा स्वयंसेविकेला काम करावे लागते; मात्र कामाच्या मोबदल्यापोटी अत्यंत कमी मानधन मिळत आहे. त्यामुळे आशा स्वयंसेविकांना दरमहा किमान ५ हजार रुपये वेतन आणि मोबाइल भत्ता, स्टेशनरी खर्च मिळाला पाहिजे. सर्वेक्षणाच्या कालावधीत आशा वर्करसाठी संरक्षणाची उपाययोजना करणे गरजेचे आहे.
-अपर्णा अशोक भातकुले
आशा स्वयंसेविका, नागरी आरोग्य केंद्र नायगाव, अकोला.

समाज आणि आरोग्य विभागातील महत्त्वाचा दुवा म्हणून आशा स्वयंसेविका काम करतात; परंतु त्यांना कामाचा मिळणारा मोबदला अत्यंता तुटपुंजा आहे. त्यामुळे आशा स्वयंसेविकांना दरमहा किमान पाच हजार रुपये वेतन व आवश्यक असलेल्या सोयी-सुविधा मिळाल्या पाहिजे.
-प्रतिभा अवचार
संस्थापक अध्यक्ष, क्रांती आशा फाउंडेशन, अकोला.
 

 

Web Title: 'Asha' workers get low honororium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला