श्रींच्या पालखीचे जिल्ह्यात आगमन
By Admin | Updated: July 26, 2014 22:52 IST2014-07-26T22:52:11+5:302014-07-26T22:52:11+5:30
पंढरपूरच्या विठु माऊलीचे दर्शन घेवून परतीच्या प्रवासात निघालेल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे आज शुक्रवारला बुलडाणा जिल्ह्यात आगमन झाले.

श्रींच्या पालखीचे जिल्ह्यात आगमन
सिंदखेडराजा : आषाढी यात्रा आटोपून पंढरपूरच्या विठु माऊलीचे दर्शन घेवून परतीच्या प्रवासात निघालेल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे आज शुक्रवारला बुलडाणा जिल्ह्यात आगमन झाले. दरम्यान, मराठवाडा-विदर्भाच्या सरहद्दीवर श्रींच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. तसेच मातृतिर्थ सिंदखेडराजा नगरीत पालखीचे आगमन होताच प्रवेश द्वारावर नगराध्यक्षा सौ.नंदाताई विष्णू मेहेत्रे यांनी पुष्प अर्पण करुन स्वागत केले. शेगावीचा राणा श्री संत गजानन महाराजांची दिंडी जालना मुक्काम आटोपून आज २५ जुलै रोजी दुपारी २ वाजता मराठवाड्यातून विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या माळसावरगाव शिवारात पोहचली. येथे आगमन होताच दिंडीतील सर्व वारकर्यांनी श्री संत गजानन महाराजांचा जयघोष करीत ह्यह्यगण गण गणात बोतेह्णह्ण च्या निनादात टाळमृदंगाच्या तालावर बेधुंद होऊन पावली खेळली. विदर्भाच्या प्रवेशद्वारावर हजारो भाविक भक्तांनी पालखीचे स्वागत करुन श्रींचे दर्शन घेतले. शुक्रवारला दुपारी २ वाजता मायभुमीत श्रींच्या पालखीचे आगमन होताच माळसावरगाव, तुळजापूर, नशिराबाद, अंचली येथील ग्रामस्थांनी दिंडीतील वारकर्यांना चहा, फराळ वाटप केले. तसेच स्थानिक जिजामाता अध्यापक विद्यालय, जिजाऊसृष्टी, मोती तलाव, संत भगवान बाबा कला विद्यालय तसेच टी पॉईंटवर भाविकांना चहा नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली. दिंडीचे आगमन होताच प्रवेशद्वारावर सिंदखेडराजाच्या नगराध्यक्षा सौ.नंदाताई व विष्णू मेहेत्रे यांनी सपत्नीक श्रींच्या पालखीचे दर्शन घेऊन स्वागत केले. तसेच न.प.उपाध्यक्ष चंदू साबळे, सिताराम चौधरी, दिलीप आढाव, प्रकाश मेहेत्रे, काशिनाथ मेहेत्रे, नंदू वाघमारे यांच्यासह नगरसेवकांनी व भाविकांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत दिंडीचे स्वागत केले व श्रींचे दर्शन घेतले. तहसिल, महसुल विभाग, पंचायत समिती, शाळांच्या कर्मचार्यांनीही श्रींचे दर्शन घेतले. नंतर सिंदखेडराजा शहरामधून गजाननाचा जयघोष करीत शोभायात्रा निघाली. रात्री रामेश्वर महाराज संस्थानच्या वतीने सर्व वारकर्यांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. दिंडीच्या मुक्कामाची व्यवस्था जिजामाता कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आली होती, दिंडीच्या आगमनप्रसंगी शहरामध्ये स्वागत कमानी लावण्यात आल्या होत्या. दिंडीसोबत १ हजार वारकरी असून, हत्ती, अश्व, गाड्यांचा ताफा आहे. शिवाय उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी यांच्यासह १ पी.आय., ४ पीएसआय असा एकूण ६५ पोलिस कर्मचार्यांचा बंदोबस्त होता. उद्या २६ जुलै रोजी सकाळी दिंडी किनगावराजा-दुसरबीड मार्गे बिबी मुक्कामासाठी रवाना होणार आहे.