मोठ्या वाहनांचे टायर चोरी करणारा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:16 IST2021-02-05T06:16:39+5:302021-02-05T06:16:39+5:30
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई सात लाखांचा मुद्देमाल हस्तगत अकोला : शहरासह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत उभ्या असलेल्या वाहनांचे ...

मोठ्या वाहनांचे टायर चोरी करणारा जेरबंद
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई सात लाखांचा मुद्देमाल हस्तगत
अकोला : शहरासह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत उभ्या असलेल्या वाहनांचे टायर चोरी करणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यातील एका अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी सायंकाळी अटक केली. त्याच्याकडून सुमारे सात लाख रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाडेगाव येथील रहिवासी अमोल हरिभाऊ फाळके यांच्या वाहनाचे सहा टायर अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची तक्रार बाळापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आणि गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरखेडा येथील रहिवासी अशोक गोपीनाथ काळे याने जिल्ह्यातील वाहनांचे टायर चोरी केल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अशोक काळे यास ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने बाळापूर पोलीस स्टेशन, पातूर पोलीस स्टेशन, दहीहंडा पोलीस स्टेशन, सिविल लाइन्स पोलीस स्टेशन, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उभ्या असलेल्या वाहनांचे टायर चोरी केल्याची कबुली दिली. यावरून पोलिसांनी त्यांच्याकडून एक लाख ४२ हजार रुपयांचे चोरलेले टायर व टायर चोरीसाठी तसेच ने आण करण्यासाठी वापरलेला एक ट्रक किंमत सुमारे पाच लाख रुपये असा एकूण सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीला बाळापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन चव्हाण, जयंत सोनटक्के, अश्विन मिश्रा, शक्ती कांबळे, संदीप काटकर, शेख वसीम, अनिल राठोड, प्रवीण कशयप, सायबर पोलीस स्टेशनचे ओम देशमुख, गणेश सोनणे, गोपाळ ठोंबरे यांनी केली.