महापालिकेत आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:20 IST2021-02-05T06:20:53+5:302021-02-05T06:20:53+5:30

राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यापासून महापालिकेत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सत्ताधारी भाजपच्या विराेधात विविध आघाड्यांवर माेर्चे उघडल्याचे दिसून येत आहे. सर्वसाधारण सभेतील कामकाज ...

Appoint an IAS officer in the Municipal Corporation! | महापालिकेत आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करा!

महापालिकेत आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करा!

राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यापासून महापालिकेत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सत्ताधारी भाजपच्या विराेधात विविध आघाड्यांवर माेर्चे उघडल्याचे दिसून येत आहे. सर्वसाधारण सभेतील कामकाज नियमानुसार हाेत नसल्याच्या सेनेच्या तक्रारीवरून राज्य शासनाने सर्वसाधारण व स्थायी सभेतील एकूण २० ठराव विखंडित करण्याचा आदेश २४ डिसेंबर २०२० राेजी जारी केला. त्यात भरीस भर मागील तीन वर्षांच्या कालावधीत पार पडलेल्या सर्वसाधारण सभांमधील कामकाजाच्या चाैकशीचा आदेश जारी करून सत्ताधारी भाजपला जाेरदार धक्का दिला. याकरिता विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांच्या निर्देशानुसार चार सदस्यीय समितीचे गठन करण्यात आले असून, समितीकडून चाैकशीला प्रारंभ झाला आहे. यादरम्यान, मध्यंतरी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्या बदलीचे वारे वाहू लागले हाेते. ही बाब ध्यानात घेता शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मनपात आयएएस अधिकाऱ्याच्या नियुक्तीसाठी गळ घातल्याची माहिती आहे.

रिक्त पदांचा अनुशेष वाढला!

मनपाचा प्रशासकीय कारभार सुरळीत चालविण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नितांत आवश्यकता आहे. मागील अनेक वर्षांपासून अधिकाऱ्यांची पदे रिक्त असून, ही पदे रिक्त असल्यास मनपातील पदाधिकारी व काही अधिकाऱ्यांचे चांगलेच फावते.

दहा वर्षांपासून ‘आयएएस’नाहीच!

मनपात २०१० मध्ये आयएएस डाॅ. विपीनकुमार शर्मा यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला हाेता. त्यांची बदली झाल्यानंतर आजपर्यंतही मनपाला आयएएस दर्जाचा अधिकारी मिळाला नाही, हे विशेष.

Web Title: Appoint an IAS officer in the Municipal Corporation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.