अकोलेकरांना दक्षिण भारतात जाण्यासाठी आणखी एक गाडी
By Atul.jaiswal | Updated: April 1, 2023 16:34 IST2023-04-01T16:34:17+5:302023-04-01T16:34:58+5:30
गाडी अकोला, वाशिम मार्गे जाणार असल्याने दोन्ही जिल्ह्यातील प्रवाशांना दक्षीण भारतात जाण्यासाठी आणखी एक रेल्वे उपलब्ध होणार आहे.

अकोलेकरांना दक्षिण भारतात जाण्यासाठी आणखी एक गाडी
अकोला : गुजरात राज्यातील राजकोट ते तेलंगणा राज्यातील मेहबुबनगर या दोन स्थानकांदरम्यान धावणारी उन्हाळी साप्ताहिक विशेष गाडी सोमवार, ३ एप्रिलपासून चालविण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. ही गाडी अकोला, वाशिम मार्गे जाणार असल्याने दोन्ही जिल्ह्यातील प्रवाशांना दक्षीण भारतात जाण्यासाठी आणखी एक रेल्वे उपलब्ध होणार आहे.
पश्चिम रेल्वेतील सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, गाडी क्र. ०९५७५ राजकोट-मेहबुबनगर साप्ताहिक विशेष एक्सप्रेस १० एप्रिल ते २६ जूनपर्यंत दर सोमवारी राजकोट स्थानकावरून दुपारी १३.४५ रवाना होऊन मंगळवारी सायंकाळी १९.३५ वाजता मेहबुबनगर येथे पोहोचणार आहे. ही गाडी मंगळवारी सकाळी ७.५५ वाजता अकोला स्थानकावर येणार आहे.परतीच्या प्रवासात गाडी क्र. ०९५७६ मेहबुबनगर-राजकोट विशेष एक्स्प्रेस ११ एप्रिल ते २७ जूनपर्यंत दर मंगळवारी रात्री २१.३५ वाजता मेहबुबनगर स्थानकावरून रवाहना होऊन गुरुवारी पहाटे ५.०० वाजता राजकोट स्थानकावर पोहोचणार आहे. या गाडीला द्वितीय श्रेणी वातानुकुलीत, तृतीय श्रेणी वातानुकुलीत, द्वितीय श्रेणी शयनयान व जनरल अशी संरचना असणार आहे. उन्हाळी विशेष असल्याने या गाडीसाठी भाडेही विशेष आकारले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
कोणत्या स्थानकांवर थांबणार?
या विशेष गाड्यांना वांकानेर, सुरेंद्रनगर, अहमदाबाद, नडियाद, आणंद, वडोदरा, सूरत, नंदुरबार, जळगाव, भुसावल, अकोला, वाशिम, हिंगोली, बसमत, पूर्णा, नांदेड़, मुदखेड़, धरमाबाद, बासर, निजामाबाद, कामारेड्डी, मेडचल, काचीगुड़ा, शादनगर आणि जडचर्ला स्थानकांवर थांबा असणार आहे.