संतप्त शेतकर्‍यांनी कर्मचार्‍यांना कोंडले

By Admin | Updated: August 20, 2014 00:27 IST2014-08-20T00:27:00+5:302014-08-20T00:27:00+5:30

डीएमओ कार्यालयातील प्रकार; नाफेडने खरेदी केलेल्या कृषी मालाचे पैसे दिलेच नाही

Angry farmers started the workforce | संतप्त शेतकर्‍यांनी कर्मचार्‍यांना कोंडले

संतप्त शेतकर्‍यांनी कर्मचार्‍यांना कोंडले

अकोला: नाफेडने हमी भावात कृषी मालाची खरेदी केली खरी; मात्र सहा महिन्यानंतरही मालाचे पैसे दिलेच नसल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी मंगळवारी दुपारी सिंधी कॅम्प परिसरातील जिल्हा मार्केटिंग कार्यालयावर धडक दिली. यावेळी शेतकर्‍यांनी कार्यालयातील खुच्र्यांसह साहित्याची तोडफोड करीत अधिकार्‍यांना कार्यालयात डांबून ठेवले.
नाफेडच्या वतीने मार्च महिन्यात हमी भावात तुरीची खरेदी करण्यात आली. शेतमाल खरेदी केल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत पैसे शेतकर्‍यांना मिळायला हवे. मात्र, सहा महिन्यानंतर ऑगस्ट महिना उलटला असला तरी अद्याप शेतकर्‍यांना पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे पाटखेड व निमकर्दा येथील शेतकरी डीएमओ कार्यालयावर धडकले. यावेळी जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यामुळे शेतकर्‍यांनी अधिकार्‍यांना तत्काळ बोलवा, असे कर्मचार्‍यांना सांगितले; मात्र, अधिकार्‍यांना येण्यास विलंब झाल्यामुळे शेतकर्‍यांनी कार्यालयातील खुच्र्यासह साहित्याची तोडफोड केली. तसेच कर्मचार्‍यांना आतमध्ये डांबून बाहेरून कुलूप लावून घेतले. त्यानंतर कार्यालयाबाहेर ठिय्या दिला. गतवर्षीच्या हंगामातील तुरी शेतकर्‍यांनी चांगले भाव मिळावे, यासाठी नाफेडकडे विकल्या. त्याचा मोबदला अद्याप मिळाला नाही. ही व्यथा मांडताना पाटखेड येथील शेतकरी हर्षल ताथोड यांनी सांगितले, की यावर्षी पाऊस उशिरा झाला असल्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आले आहेत. त्यांच्याकडे पेरणीलाही पैसे नाहीत.
शेतकर्‍यांनी बँकेतून पीककर्ज घेतले होते. त्यांच्याकडे कर्ज भरण्यासाठीही पैसे नसून, बँकेचे अधिकारी पैशांसाठी तगादा लावत आहेत. गतवर्षीच्या मालाचे पैसे बाकी असणारे जगन्नाथ निंबीकर रुग्णालयात भरती असून, त्यांच्या कुटुंबीयांकडे उपचार करण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांनी काय करावे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावेळी मंगेश कुचर, हर्षल ताथोड, कैलास खेडकर, शरद शेंडे, सागर जगन्नाथ निंबेकर, अक्षय कवरकार, दिनेश कवरकार, सुरेश नेवालकर, सागर बाळाभाऊ निंबेकर, शिवम धांडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

** प्रती क्विंटल दीड हजारांचे नुकसान

शेतकर्‍यांनी मार्च महिन्यामध्ये नाफेडला ३,५00 रुपये प्रती क्विंटलप्रमाणे तुरीची विक्री केली. त्यांना अद्याप पैसे मिळाले नाही. सध्या तुरीचे भाव पाच हजार रुपये प्रती क्विंटलच्या वर आहेत. शेतकर्‍यांनी ३,५00 रुपयांमध्ये तुरीची विक्री करून आतापर्यंत त्यांना पैसे मिळालेच नाही. शेतकर्‍यांनी तूर साठवून आता जर विक्री केली असती त्यांना प्रती क्विंटल दीड हजार रुपयांचा फायदा झाला असता.

** एक तर पैसे द्या, नाही तर तूर द्या

शेतकर्‍यांनी नाफेडकडे तूर विकली. मात्र, त्यांना सहा महिन्यानंतरही पैसे मिळाले नाहीत. यावर्षी अल्पवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. आता शेतकर्‍यांकडे पैसे नाहीत. तर बाजारात विक्री करण्यासाठी शेतमालही नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी एक तर आम्हाला आमच्या मालाचे पैसे द्या, अन्यथा तूर परत द्या. आम्ही ती बाजारात विकून पैसे मिळवितो, अशी मागणी अधिकार्‍यांकडे केली.

** आठ दिवसात मिळणार शेतकर्‍यांना पैसे

डीएमओ कार्यालयाला कुलूप ठोकून कर्मचार्‍यांना आतमध्ये डांबल्यामुळे खदान पोलिसांनी शेतकर्‍यांना ताब्यात घेतले. यावेळी निमकर्दा व पाटखेड गावातील शेतकर्‍यांसह आ. रणजीत पाटील पोलिस स्टेशनमध्ये उपस्थित झाले. शेतकर्‍यांना तुरीचे पैसे केव्हा देता याबाबत निश्‍चित माहिती देण्याची मागणी आ. पाटील यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी मनोज वाजपेयी यांना केली. वाजपेयी पैसे केव्हा मिळणार, याची माहिती देण्यास टाळाटाळ करीत होते. अखेरीस त्यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांशी बोलून आठ दिवसात पैसे देणार असल्याचे आश्‍वासन आ. पाटील व शेतकर्‍यांना दिले.

** दहा शेतकर्‍यांवर गुन्हा दाखल

आदर्श कॉलनीतील महाराष्ट्र स्टेट को ऑप मार्केटिंग फेडरेशन कार्यालयात आंदोलन करून सार्वजनिक मालमत्तेस हानी पोहोचवून व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी खदान पोलिसांनी मंगळवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास शेतकरी हर्षल विठ्ठलराव ताथोड (२६ निमकर्दा), मंगेश महादेव कुचर (३0 पाटखेड), सुरेश लक्ष्मणराव नेहवाल (३५ पाटखेड), कैलास चंद्रमण खेळकर (४७), सागर जगन्नाथ निंबेकर (१९), शरद प्रभाकर शेंडे (२५), अक्षय प्रल्हाद कवरकार (१९), दिनेश वासुदेव कवरकार (२५), सागर बाळाभाऊ निंबेकर (२0), शिवम गजानन धांडे (१९) सर्व रा. निमकर्दा यांच्याविरुद्ध भादंवि कलम १४३, १४९, ३५३, ३३२, ४५२, ३४२, ५0४, आर/डब्लू कलम ३ आणि सार्वजनिक मालमत्ता प्रतिबंधक १९९४ कलम ३ नुसार गुन्हा दाखल केला.

** अधिकार्‍यांवरील कारवाईसाठी शेतकर्‍यांचा ठाण्यात ठिय्या
महाराष्ट्र स्टेट को ऑप मार्केटिंग फेडरेशन कार्यालयातील अधिकारी बाळकृष्ण गावंडे व इतर अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांना उद्धट वागणूक व शिवीगाळ केल्यामुळे शेतकरी संतप्त झाले. अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांची समस्या ऐकून न घेता, त्यांच्याविरुद्ध जाणीवपूर्वक तक्रार दिली. या अधिकार्‍यांविरुद्ध पोलिसात तक्रार दिली. परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने शेतकर्‍यांनी खदान पोलिस ठाण्यात ठिय्या दिला.

** ठाणेदारासोबतच शाब्दिक बाचाबाची

शेतकर्‍यांविरुद्ध गुन्हे दाखल केल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी व शिवसेनेचे जि.प. सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी खदानचे ठाणेदार छगनराव इंगळे यांना जाब विचारला आणि शेतकर्‍यांना वेठीस धरणार्‍या अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. परंतु ठाणेदार इंगळे यांनी, शेतकर्‍यांनी कार्यालयात धुडगूस घालून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचे सांगितले. परंतु शेतकर्‍यांनी त्यांना अधिकार्‍यांवर गुन्हा होईपर्यंत आम्ही येथून हलणार नाही. आम्ही येथेच ठिय्या आंदोलन करू, असे सांगताच ठाणेदार इंगळे यांनी ठाण्यात ठिय्या दिल्याप्रकरणी पुन्हा गुन्हा दाखल करेल, असा इशारा दिला.

Web Title: Angry farmers started the workforce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.