ambulance service employee expelled | महिलेच्या मृत्यूप्रकरणी रुग्णसेविका कर्मचारी बडतर्फ
महिलेच्या मृत्यूप्रकरणी रुग्णसेविका कर्मचारी बडतर्फ

अकोला: जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती जमीरउल्लाखा पठाण यांच्या हिवरखेड गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळेवर उपचार न मिळाल्याने गर्भवती महिला वाहक शीला सफल वाकोडे यांचा मृत्यू झाला. यावेळी रुग्णावाहिका उपलब्ध न झाल्याने राष्ट्रीय अ‍ॅम्ब्युलन्स सेवेचे पर्यवेक्षक नितेश थोरात यांना पदावरून बडतर्फ तर वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश देवर यांचे एक महिन्याचे वेतन कपात करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी मंगळवारी आरोग्य विभागाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत दिला.
अकोट एसटी डेपोत वाहक म्हणून कार्यरत असलेल्या शीला सफल वाकोडे यांना १४ जून रोजी प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या, तसेच त्यांना रक्तदाबाचाही त्रास होता. कुटुंबीयांनी तत्काळ त्यांना खासगी वाहनाने जवळच असलेल्या हिवरखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. तेथे कर्तव्यावर असलेले डॉक्टर उपस्थित नव्हते. प्रकृती बिघडत असल्याने उपस्थित परिचारिकेने त्यांना संदर्भसेवेसाठी अकोट येथे जाण्याचा सल्ला दिला. त्यासाठी १०८ रुग्णवाहिकेची विचारणा करण्यात आली. त्यावेळी १०८ रुग्णवाहिका पंक्चर होती. सोबत स्टेपनी नसल्याने दुसºया गावातील रुग्णवाहिका बोलवावी लागेल. त्यासाठी दीड-दोन तास लागतील, असे सांगण्यात आले. त्यामुळे नातेवाइकांनी नाइलाजास्तव खासगी वाहनातून नेण्याचा निर्णय घेतला. वेळेवर उपचार न मिळाल्याने रस्त्यातच या महिलेचा पोटातील बाळासह दुर्दैवी मृत्यू झाला. अकोट येथे पोहोचताच तेथील डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले. या बाबीवर आरोग्य विभागाच्या कार्यकारी सभेत चर्चा झाली. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कारवाईचा आदेश दिला.

 


Web Title: ambulance service employee expelled
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.