वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्य सेवा अधांतरी भारतीय जनता पार्टीचा आरोप
By Admin | Updated: May 13, 2014 21:19 IST2014-05-13T00:33:37+5:302014-05-13T21:19:35+5:30
सामान्य रुग्णालयामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ऑक्टोबर २००२ पासून कार्यान्वित झाल्यानंतर आरोग्य सेवा अधांतरी असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीने केला आहे.

वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्य सेवा अधांतरी भारतीय जनता पार्टीचा आरोप
अकोला : सामान्य रुग्णालयामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ऑक्टोबर २००२ पासून कार्यान्वित झाल्यानंतर येथील आरोग्य सेवेत कुठलाही बदल झाला नसून, वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्य सेवा अधांतरी असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीने केला आहे. सामान्य रुग्णालय असताना असलेल्या सुविधांचाही ब्याबोळ या ठिकाणी करण्यात आला असून, येथील सुविधा सामान्यांना चांगल्या प्रकारे मिळाव्यात, अशी मागणीही भाजपाने केली आहे.
नागपूर आणि यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ज्याप्रमाणे रुग्णांना सेवा पुरवित आहे त्याचप्रमाणे अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनानेही रुग्णांना अत्याधुनिक व अद्ययावत सेवा पुरविण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी भाजपाने निवेदनाद्वारे केली आहे. जिल्ह्यातील महिलांना सुविधा व्हावी याकरिता वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आलेली मॅमोग्राफी मशीन केवळ तज्ज्ञ व्यक्ती नसल्याने बंद असून, यावर तंत्रज्ञाची नियुक्ती करून ही मशीन सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. नॅरोकंडक्टन यंत्र या ठिकाणी उपलब्ध आहे; मात्र त्याचा रुग्णांना कुठलाही उपयोग नसल्याचा आरोप भाजपाने केला आहे. वैद्यकीय महाविद्यालयात असलेल्या एक्सरे मशीन जुन्या पद्धतीच्या असून, काळानुरूप या ठिकाणी अत्याधुनिक एक्सरे मशीन बसविण्यात याव्या, अशी मागणी करण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात व प्रत्येकच वॉर्डात प्रचंड घाण साचली असून, साफसफाई अजिबात होत नसल्याचा आरोप भाजपाने केला असून, येथील साफसफाई नियमित करण्याची मागणीही भाजपाने केली आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात व वॉर्डात लाईट, पंखे बसविण्याची मागणीही भाजपाने केली असून, येथील कारभार अधांतरी सुरू असून, हा कारभार तातडीने सुधारण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार न सुधारल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.