"तुझ्या गर्भातील बाळ माझे नाही, त्यामुळे गर्भपात कर," असा दम देत पतीने आपला शारीरिक, आर्थिक व मानसिक छळ चालविल्याची तक्रार रहाटगाव येथील एका माहेरवाशिणीने नांदगाव पेठ पोलिसांत नोंदविली आहे. या प्रकरणी पोलिसांनी २२ जुलैला तिचा पती अक्षय रमेश गाडगे (२९) व एक ६५ वर्षीय महिला (दोघेही रा. पातूर, जि. अकोला) यांच्याविरुद्ध कौटुंबिक छळाचा गुन्हा नोंदविला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी तू लग्नात माहेरहून काहीच आणले नाहीस. आम्हाला चारचाकी गाडी व एसी पाहिजे. त्यासाठी पाच लाख रुपये व सोन्याचा गोफ घेऊन ये, असे पती व सासूने तिला बजावले. ती बाब तिने आईला सांगितल्याने लग्नाच्या तिसऱ्या दिवशी ६ डिसेंबर २०२४ रोजी विवाहितेच्या आईने अमरावती येथून सोफा, देवघर, डायनिंग टेबल मुलीच्या सासरी पाठविले.
माहेरी बोलण्यास बंदी
त्यानंतरही विवाहितेचा छळ सुरूच राहिला. तिला माहेरी फोनवरूनदेखील बोलण्यास मज्जाव करण्यात आला. पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला अनेकदा शिवीगाळ व मारहाण केली. पती अक्षयने पत्नीला तिच्या आईने तिच्यासाठी घेतलेली स्कूटी व लॅपटॉपदेखील सासरी आणायला लावला.
विवाहितेला घरातून काढले बाहेर
१३ मे रोजी पती व सासूने विवाहितेला घराबाहेर काढले. त्यामुळे तिची आई व भाऊ तिला माहेरी रहाटगाव येथे घेऊन आले. दरम्यान, २७ मे रोजी आरोपी अक्षय हा सासरी आला. ती त्याच्यासोबत सासरी परतली. मात्र, ७ जुलैला पतीने तिच्याशी पुन्हा वाद घातला व तिला घराबाहेर काढले.
२० जुलैला रात्री आठच्या सुमारास पती अक्षय गाडगे हा रहाटगाव येथे सासरी आला. पत्नीच्या पोटावर लाथा हाणल्या तथा 'हे बाळ माझे नाही,' असे म्हणत तिला गर्भपात करून घेण्याची तंबी दिली. तो एवढ्यावरच न थांबता त्याने पत्नीच्या आईसह शिवीगाळ केली. नातेवाइकांना शिवीगाळ केली.