Akola: पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड; दोन दिवसांत पीकविमा काढणार कसा? हजारो शेतकरी वंचित राहणार
By रवी दामोदर | Updated: July 29, 2023 13:01 IST2023-07-29T13:01:22+5:302023-07-29T13:01:55+5:30
Crop Insurance: प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत जिल्ह्यात हजाराे शेतकऱ्यांना पीक काढायचा राहिला असताना, पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड आल्याने शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे़ यावर्षी हवामान,पाणी पाऊस प्रतिकुल असल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे़

Akola: पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड; दोन दिवसांत पीकविमा काढणार कसा? हजारो शेतकरी वंचित राहणार
- रवि दामोदर
अकोला - प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत जिल्ह्यात हजाराे शेतकऱ्यांना पीक काढायचा राहिला असताना, पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड आल्याने शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे़ यावर्षी हवामान,पाणी पाऊस प्रतिकुल असल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे़ विमा काढायची अंतिंम मुदत ही ३१ जुलै म्हणजेच दाेनच दिवसावर आली आहे़ यामुळे शेतकऱ्यांना सेतू केंद्रावर चकरा मारताना, वेळ,माणसिक त्रास व आर्थिक भूर्दडांचा सामना करावा लागत आहे़ असेच राहिले तर हजाराे शेतकरीपीक विमा काढण्यापासून वंचित राहणार आहेत.
शुक्रवारपर्यंत १ लाख ६८ हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला असून, अशातच पीकविमा पोर्टलमध्ये तांत्रिक अडचण आल्याने शेतकऱ्यांची नोंदणी होत नसल्याचे संपूर्ण राज्यातच चित्र आहे. या पार्श्वभूमीवर पीकविमा काढण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
पीकविमा पोर्टलमध्ये ऑनलाइन नोंदणी करताना कमीत कमी १ ते १.३० तासांचा कालावधी लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. काहीवेळा संपूर्ण माहिती भरणा होते; परंतु आधार व्हेरिफिकेशन करताना अडचण येत असल्याने अर्ज अस्वीकृत होताे.. गत आठवड्याभरापासून पोर्टलमध्ये ही तांत्रिक अडचण येत असल्याने शेतकरी हैराण झाला आहेत.
सुटीच्या दिवशीही कृषी विभागाची कार्यालये राहणार सुरू
योजनेत सहभाग घेण्यासाठी शेतकऱ्यांना कोणतेही अडचण आल्यास त्यांची अडचण दूर करण्यासाठी दि.२९ व ३० जुलै अशा सुटीच्या दिवशीही कृषी विभागाची कार्यालये सुरू राहणार आहेत.
पीकविम्या योजनेंतर्गत २.७९ लाख हेक्टर संरक्षित
आतापर्यंत तब्बल ३.५७ लाख नोंदणी करण्यात आली आहे. त्यामध्ये २ हजार ८२७ कर्जदार व ३ लाख ५४ हजार ८०२ बिगर कर्जदारांचा समावेश आहे. आतापर्यंत २.७९ लाख हेक्टर क्षेत्र संरक्षित करण्यात आले आहे.
रात्रीही शेतकरी सेतू केंद्रात
गत आठवड्याभरात दोनवेळा पोर्टल बंद असल्याचे सांगण्यात आले. सध्या रात्री १२ ते १.३० वाजताच्या सुमारास पोर्टल सुरू असल्याचे सांगण्यात येत असल्याने शेतकरी रात्रीही सेतू केंद्रात पोहोचत आहेत.