अकोला मनपा कर्मचार्यांची वाहने रस्त्यावर
By Admin | Updated: July 20, 2014 02:01 IST2014-07-20T01:49:45+5:302014-07-20T02:01:15+5:30
वाहतुकीला अडथळा; अतिक्रमकांना अभय.

अकोला मनपा कर्मचार्यांची वाहने रस्त्यावर
अकोला : महापालिका कर्मचार्यांची वाहने मनपा आवारात न ठेवता, रस्त्यावर उभी केली जात असल्यामुळे गांधी मार्गावरील वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत आहे. प्रशासनाकडून नियोजनाचा अभाव व अतिक्रमकांची पाठराखण होत असल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे चित्र आहे.
महापालिका आवारात दुचाकीसह चारचाकी वाहने ठेवली जातात. यामध्ये मनपा कर्मचार्यांसह नगरसेवकांचा समावेश आहे; परंतु गांधी मार्गावरील बाजारपेठेत खासगी कामासाठी येणारे नागरिकसुद्धा त्यांची वाहने मनपा आवारात ठेवतात. यामुळे मनपात प्रचंड वर्दळ सुरू असते. मनपा कर्मचार्यांना शिस्त लावणे व मनपा आवारातील वाहनांची वर्दळ कमी होण्याच्या उद्देशातून उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी कर्मचार्यांची वाहने मनपाच्या बाहेर आवारभिंतीलगत ठेवण्याचे निर्देश दिले. मनपाच्या आवारभिंतीलगत हातगाडीवर रेडीमेड ड्रेस विक्री करणार्या अतिक्रमकांनी ठाण मांडले आहे.
या अतिक्रमकांना हटवून या ठिकाणी वाहने उभी करण्याचे निर्देश उपायुक्तांनी अतिक्रमण विभाग व सुरक्षा रक्षकांना दिले. त्यानुषंगाने कर्मचार्यांची वाहने आवारभिंतीलगत ठेवली जात आहेत; परंतु याठिकाणी अतिक्रमकांचा ठिय्या कायम असल्याने मनपा कर्मचार्यांना नाईलाजाने त्यांची वाहने रस्त्यावर ठेवावी लागत आहेत. परिणामी गांधी मार्गावरील वाहतूक व्यवस्था पूर्णत: विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. ही बाब १९ जुलै रोजी मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या लक्षात येताच त्यांनी आवारभिंतीलगतचे अतिक्रमण हटविण्याच्या सूचना अतिक्रमण विभागासह सुरक्षा रक्षकांना दिल्या.