अकोला-खंडवा गेज परिवर्तन मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून नको!

By Atul.jaiswal | Published: July 16, 2020 11:45 AM2020-07-16T11:45:27+5:302020-07-16T11:50:09+5:30

अभयारण्याबाहेरच्या पर्यायी मार्गाचा विचार करावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

Akola-Khandwa gauge change not through Melghat Tiger Project! | अकोला-खंडवा गेज परिवर्तन मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून नको!

अकोला-खंडवा गेज परिवर्तन मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून नको!

googlenewsNext
ठळक मुद्दे३८ किलो मीटरचा पट्टा हा मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जातो. व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातील जैवविविधता धोक्यात येईल.बाहेरून नेण्याच्या फायद्यांचाही उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

अकोला : दक्षिण-मध्य रेल्वेच्याअकोला ते खंडवा गेज परिवर्तनाचे काम मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून गेलेल्या मीटरगेज मार्गावर न करता त्यासाठी या अभयारण्याबाहेरच्या पर्यायी मार्गाचा विचार करावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर व रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांच्याकडे मंगळवारी लिहिलेल्या एका पत्राद्वारे केली आहे.
अकोला ते खंडवा या एकूण १७६ किमी लांबीच्या रेल्वेमार्गाचा ३८ किलो मीटरचा पट्टा हा मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जातो. यापैकी २३ किलोमीटरचा मार्ग हा व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातून जात असल्याने ब्रॉडगेज परिवर्तनाच्या कामाचा कधीही भरून न निघणारा परिणाम आधीच नामशेष होत असलेल्या वाघ व त्यांच्या अधिवासावर होईल. त्यामुळे गेज परिवर्तनासाठी या व्याघ्र प्रकल्पाबाहेरून जाणाऱ्या पर्यायी मार्गावर भर देणे योग्य राहील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.
सध्या अस्तित्वात असलेल्या मेळघाटातील मीटरगेज मार्गाचेच गेज परिवर्तन झाल्यास या मार्गावर रेल्वेचे आवागमण वाढण्यासोबतच प्रदूषणातही वाढ होईल. यामुळे व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातील जैवविविधता धोक्यात येईल. गाभा क्षेत्रातील १३ गावांचे पुनवर्सन करून हा भाग संरक्षित करण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील वन्य प्राण्यांच्या संख्येत लक्षनिय वाढ झाली आहे. आता याच भागातून ब्रॉडगेज रेल्वेमार्ग गेल्यास आतापर्यंत केलेले प्रयत्न मातीमोल होतील, असेही मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण व भारतीय वन्यजीव संस्था (डब्ल्यूआयआय) यांनीही व्याघ्र प्रकल्पाबाहेरचा पर्यायी मार्गच उत्तम राहील, अशी शिफारस केली होती, याकडेही मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.

...हे तर नव्याने मार्ग टाकण्यासारखेच
अकोला-खंडवा गेज परिवर्तनाच्या कामात केवळ गेज परिवर्तनच नव्हे, तर सध्या अस्तित्वात असलेल्या मीटरगेज मार्गावरील धोकादायक वळण सरळ करणे व बोगद्यांचाही समावेश आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून गेलेल्या २३.८ किमी मार्गावरील अति तीव्र वळण सरळ करण्याचे काम म्हणजे नव्याने रेल्वेमार्ग टाकण्यासारखेच होईल, या मुद्याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले आहे.

१०० गावे रेल्वे मार्गावर येतील
हा रेल्वेमार्ग मेळघाटातील वान अभयारण्याऐवजी बाहेरून नेण्याच्या फायद्यांचाही उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला आहे. पर्यायी मार्गाला हिरवी झेंडी दिल्यास मेळघाटातील जैवविधिता तर अबाधित राहीलच, सोबत बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव-जामोद व संग्रामपूर तालुक्यातील जवळपास १०० गावे रेल्वेमार्गावर येतील. त्यामुळे या भागाचा विकास होण्यासही मदत होईल.

 

Web Title: Akola-Khandwa gauge change not through Melghat Tiger Project!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.