सूर्य कोपला; अकोल्याचे तापमान चाळिशी पार, पारा ४१.१ अंशांवर!

By रवी दामोदर | Updated: April 13, 2023 13:10 IST2023-04-13T13:09:41+5:302023-04-13T13:10:41+5:30

उन्हाच्या चटक्यांनी होरपळ, उकाड्याने अकोलेकर हैराण

Akola getting hottest with 41 degree temperature this summer | सूर्य कोपला; अकोल्याचे तापमान चाळिशी पार, पारा ४१.१ अंशांवर!

सूर्य कोपला; अकोल्याचे तापमान चाळिशी पार, पारा ४१.१ अंशांवर!

रवी दामोदर, अकोला: यावर्षी मार्च महिन्यातच सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच अवकाळीने हजेरी लावल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता. आता पुन्हा तापमापीतील पारा सातत्याने वर चढत आहे. सूर्य अक्षरश: कोपल्याने बुधवार, दि. १२ एप्रिल रोजी अकोला शहराचे तापमान ४१.१ अंशांवर पोहोचले. पाऱ्याचा आलेख दिवसेंदिवस वाढताच असल्याने अकोलेकरांची होरपळ होत आहे. दिवसभर उकाड्याने अकोलेकर हैराण झाले आहेत.

जगभरात अकोला शहर कडक उन्हासाठी प्रसिद्ध असून, दरवर्षी ऊन नवा उच्चांकावर पोहोचत आहे. त्याचाच प्रत्यय गत दोन-चार दिवसांपासून येत आहे. गत चार दिवसांपासून शहरासह जिल्ह्याचे तापमान सातत्याने वाढत असून, पाऱ्याने चाळिशी ओलांडली आहे. बुधवारी अकोला शहरातील तापमान ४१.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. हे तापमान विदर्भातून अव्वल होते. आगामी दिवसात पुन्हा अवकाळीची शक्यता आहे. परंतु, एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात उष्णतेची ही लाट अशीच कायम राहून पारा ४५ अंश सेल्सिअसवर जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

बाजारपेठा सामसूम, रस्त्यावरही वाहतूक नाही

उन्हाचा कडाका वाढल्याने नागरिक दुपारी १२ वाजल्यानंतर बाहेर पडेनासे झाले आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक महत्त्वाची कामे सकाळीच उरकून घेण्यास प्राधान्य देत आहेत. दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हाचा कडाका जास्त असल्यामुळे या कालावधीत रस्ते व बाजारपेठा निर्मनुष्य होत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.

२०१९ मध्ये मोडले होते ५० वर्षांचे रेकॉर्ड

गेल्या ५० वर्षांमध्ये सन २०१९ मध्ये एप्रिल महिन्यात तापमानाने रेकॉर्ड मोडून उच्चांक गाठला होता. दि. २९ एप्रिल २०१९ रोजी सूर्य अक्षरश: कोपला होता. त्या दिवशी जिल्ह्याचे तापमान ४७.२ अंशावर पोहोचले होते. यंदाही पारा वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे उष्माघात टाळण्याची गरज आहे.

आणखी दोन दिवस अवकाळी पावसाचे

जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज विभागीय हवामान खात्याने वर्तविला आहे. गत दहा दिवसांत तीन वेळा अवकाळीने धुमाकूळ घातला. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यात आणखी दोन-तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तविल्याने शेतकऱ्यांमध्ये धास्ती पसरली आहे.

Web Title: Akola getting hottest with 41 degree temperature this summer