अकोला मनपा प्रशासनाने प्रस्तावित चार प्रमुख रस्ते वगळले
By Admin | Updated: June 6, 2014 01:17 IST2014-06-06T00:46:29+5:302014-06-06T01:17:50+5:30
महापौर व उपमहापौरांकडून ६५0 कामांची वेगवेगळी यादी सादर

अकोला मनपा प्रशासनाने प्रस्तावित चार प्रमुख रस्ते वगळले
आशिष गावंडे / अकोला
शहरात मूलभूत विकास कामांसाठी शासनाकडून प्राप्त २६ कोटींच्या अनुदानातून सत्तापक्षाने तब्बल ६५0 प्रस्ताव तयार केले. यामध्ये महापौर ज्योत्स्ना गवई व उपमहापौर रफिक सिद्दीकी यांच्या दोन भिन्न प्रस्तावांची यादी प्रशासनाकडे जमा आहे. दोन्ही पदाधिकार्यांच्या प्रस्तावात साधम्र्य असून, एकाच कामांवर दोनदा निधीची तरतूद केल्याची माहिती आहे. प्रशासनाने या दोन्ही प्रस्तावातील चार प्रमुख रस्ते वगळून त्यांचा समावेश निव्वळ रस्ते दुरुस्तीसाठी शासनाकडुन प्राप्त १५ कोटींच्या निधीतून प्रस्तावित कामांमध्ये केला आहे.
राज्याच्या नगर विकास विभागाने २0 मार्च २0१३ रोजी अकोला मनपासाठी ८ कोटी तसेच ६ एप्रिल रोजी २0 कोटी असे एकूण २८ कोटी अनुदान मंजूर केले. या निधीतून नागरिकांच्या प्राथमिक गरजा लक्षात घेऊन सर्वसमावेशक विकास कामे अपेक्षित आहेत. यापूर्वी सत्तापक्षाने २८ कोटींच्या अनुदानातून २ कोटी रुपये घनकचरा व्यवस्थापन करणार्या कंत्राटदाराला देण्याचा ठराव मंजूर केला. उर्वरित २६ कोटींच्या निधीचे प्रस्ताव तयार करीत महापौर ज्योत्स्ना गवई व उपमहापौर रफिक सिद्दीकी यांनी स्वत:च्या दोन वेगवेगळ्य़ा याद्या तयार केल्या. दोन्ही याद्यांमिळून सुमारे ६५0 प्रस्ताव असल्याची माहिती आहे. यापैकी एकाही यादीला सभागृहाची मंजुरी नाही, हे विशेष. अशास्थितीत सत्तापक्षाने तयार केलेल्या याद्यांमध्ये एकाच कामांचा दोनदा समावेश असून, यामध्ये काही प्रमुख रस्त्यांवर निधीची तरतूद केली आहे. यादरम्यान, शासनाकडून फक्त रस्ते दुरुस्तीसाठी १५ कोटी प्राप्त झाले. या अनुदानातून मजबूत व गुणवत्तापूर्ण रस्ते निर्माण करण्याचा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांचा मानस आहे. या भूमिकेतूनच डॉ.कल्याणकर यांनी सत्तापक्षाच्या दोन्ही याद्यांचे विस्तृत वर्गीकरण करीत २६ कोटींच्या प्रस्तावातून चार प्रमुख रस्ते वगळण्याचा निर्णय घेतला आहे.