अकोला जिल्ह्यात रुग्णसंख्यावाढीचा दर १५ टक्क्यांनी घटला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 10:52 IST2020-11-07T10:50:18+5:302020-11-07T10:52:55+5:30
Akola CoronaVirus News सध्या रुग्णसंख्यावाढीचा आलेख गत पाच महिन्यातील निच्चांकी आला आहे.

अकोला जिल्ह्यात रुग्णसंख्यावाढीचा दर १५ टक्क्यांनी घटला!
अकोला: जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्यावाढीमध्ये लक्षणीय घसरण झाली असून, दररोज प्राप्त अहवालाच्या केवळ पाच टक्केच अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. सप्टेंबर महिन्यातच हेच प्रमाण २० टक्क्यांपेक्षा जास्त होते. त्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात रुग्णसंख्यावाढीमध्ये १५ टक्क्यांनी घट झाली आहे. सध्या रुग्णसंख्यावाढीचा आलेख गत पाच महिन्यातील निच्चांकी आला आहे. सद्यस्थितीत दररोज प्राप्त अहवालाच्या ५ टक्के अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. हेच प्रमाणत सप्टेंबर महिन्याच्या अखेरीसपर्यंत २० टक्क्यांपेक्षा जास्त होते. आरटीपीसीआर आणि रॅपिड ॲन्टिजनच्या आतापर्यंत झालेल्या चाचण्यांचा विचार केल्यास हे प्रमाण सप्टेंबर महिन्यात १४.०३ टक्क्यांवर होते. त्यात १.१६ टक्क्यांनी घट झाली असून, नोव्हेबरच्या पहिल्या आठवड्यात हे प्रमाण १२.८७ टक्क्यांवर आले आहे. रुग्णसंख्यावाढीचा घसरता आलेख अकोलेकरांसाठी दिलासा देणारा असला, तरी योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.
सण, उत्सवात घ्या विशेष खबरदारी
कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून सण उत्सवाच्या काळात विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. प्रामुख्याने दिवाळीच्या बाजारपेठेत जाताना मास्क आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. शिवाय, नाका-तोंडाला हात लागणार नाही, याचीदेखील खबरदारी घेण्याची गरज आहे.
मृत्यूदर मात्र कायमच
जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्यावाढीचा वेग मंदावला असला, तरी वाढता मृत्यूदर चिंतेचा विषय आहे. सप्टेंबरच्या अखेरीस जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूदर ३.१ टक्के होता, तो ०.२ टक्क्यांंनी वाढून नोव्हेंबरमध्ये ३.३ टक्क्यांवर पोहोचला आहे.
रुग्णसंख्यावाढीचा वेग कमी झाल्याने थोडा दिलासा मिळाला; परंतु रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नियमित मास्कचा उपयोग करणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन आणि नियमित हात धुणे या नियमांचे पालन करावे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक,अकोला.