अकोला महापालिकेचा चार हजार स्क्वेअर फुटाचा भूखंड हडपला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 17:40 IST2018-03-23T17:39:34+5:302018-03-23T17:40:53+5:30
अकोला : अकोला महानगरपालिकेच्या मालकीचा तब्बल चार हजार स्क्वेअर फूटाचा शासकीय भूखंड हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अकोला महापालिकेचा चार हजार स्क्वेअर फुटाचा भूखंड हडपला!
- सचिन राऊत
अकोला : अकोला महानगरपालिकेच्या मालकीचा तब्बल चार हजार स्क्वेअर फूटाचा शासकीय भूखंड हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढेच नव्हे, तर हा एक कोटी रुपये किमतीचा भूखंड लीजवर घेतल्याचे दाखवून या भूखंडाच्या खरेदी-विक्रीचाही व्यवहार पार पाडण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर नझुल शिट क्रमांक ३७ ए व प्लॉट क्रमांक-४ असा चार हजार स्क्वेअर फूट भूखंड तत्कालीन नगरपालिकेचा व आताच्या महानगरपालिकेच्या मालकीचा आहे. या भूखंडाचा मूळ हक्क व आखीव पत्रिका म्हणजेच प्रॉपर्टी कार्ड महानगरपालिकेच्या मालकीचे आहे; मात्र असे असतानाही सदर चार हजार स्क्वेअर फुटाचा तब्बल हा भूखंड रमेशचंद्र रामगोपाल अग्रवाल यांनी लीजवर घेतल्याचे दाखवून हा भूखंड नगरविकास विभागाच्या परवानगीने शेख नवेद शेख इब्राहीम यांना विकला असल्याचे समोर आले आहे. या भूखंडाची खरेदी-विक्री झाल्याने खरेदी-विक्री व्यवहार करणारे दुय्यम उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारीही संशयाच्या फेऱ्यात सापडले आहेत. शासनाच्या मालकीच्या भूखंडाची खरेदी-विक्री झाल्यानंतर भूमी अभिलेख विभागातील तत्कालीन अधिकारी अहिरे व कर्मचारी शिवाजी काळे यांनीही सदर भूखंड रमेशचंद्र अग्रवाल व नंतर शेख नवेद शेख इब्राहीम यांच्या नावावर नोंदविला आहे. या प्रकरणाची तक्रार भूमी अभिलेख विभागाच्या उपअधीक्षकांकडे झाल्यानंतर त्यांनी प्राथमिक चौक शी केली असून, सदर भूखंड महानगरपालिकेच्या मालकीचाच असल्याचे स्पष्ट झाले आहे; मात्र हा भूखंड लीजवर घेऊन खरेदी-विक्री केल्याचे दाखविण्यात येत असून, ही शासनाच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे संतोषी माता मंदिर परिसरातील २० कोटी रुपयांच्या भूखंड घोटाळ्यात संशयाच्या फेºयात असलेले शिवाजी काळे यांनीच या प्रकरणातही नोंद घेतली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास या परिसरातील आणखी शासनाचे भूखंड हडपणाºया या टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.
२०१२ मध्ये झाली खरेदी-विक्री
सदर भूखंड रमेशचंद्र रामगोपाल अग्रवाल यांच्या मालकीचा दाखवून तो शेख नवेद शेख इब्राहीम यांना विकण्यात आला आहे. २०१२ ते २०१३ या कालावधीत या भूखंडाच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार पार पडलेला आहे.