शहरातील व्यावसायिक रामप्रकाश मिश्रा यांच्यावर प्राणघातक हल्ला; चाकूने केले वार

By आशीष गावंडे | Updated: August 31, 2024 10:38 IST2024-08-31T10:37:31+5:302024-08-31T10:38:02+5:30

दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांनी केला हल्ला; हल्लेखोर पसार

Akola city businessman Ram Prakash Mishra stabbed with a knife attackers ran away | शहरातील व्यावसायिक रामप्रकाश मिश्रा यांच्यावर प्राणघातक हल्ला; चाकूने केले वार

शहरातील व्यावसायिक रामप्रकाश मिश्रा यांच्यावर प्राणघातक हल्ला; चाकूने केले वार

आशिष गावंडे, अकोला: शहरातील प्रख्यात व्यावसायिक तथा ईगल इन्फ्रा लिमिटेड कंपनीचे प्रतिनिधी रामप्रकाश मिश्रा यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास मिश्रा यांच्या घराबाहेर घडली. या घटनेत मिश्रा हे गंभीर जखमी झाले असून त्यांना वाहन चालकाने तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याची माहिती आहे.

व्यावसायिक रामप्रकाश मिश्रा हे शुक्रवारी रात्री दिल्ली येथून अकोल्यात पावणे अकराच्या सुमारास दाखल झाले. चारचाकी वाहनाचा दरवाजा उघडून ते बाहेर येताच त्याठिकाणी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांच्यावर अचानक चाकूने हल्ला चढविला.  त्या हल्ल्याचा मिश्रा यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. ही बाब मिश्रा यांच्या वाहन चालकाच्या लक्षात येताच त्याने मिश्रा यांच्याकडे धाव घेतली.  तोपर्यंत हल्ला करून दोन्ही हल्लेखोर दुचाकीने पसार झाले.  वाहन चालकाने मिश्रा यांना रक्तबंबाळ अवस्थेत खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस उपअधीक्षक सतीश कुलकर्णी,  खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके त्यांच्या पथकासह मिश्रा यांच्या निवासस्थानी जाऊन परिसराची तपासणी केली. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी करण्यात आल्याची माहिती आहे. 
दरम्यान, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. 
...........................
मिश्रा यांना गंभीर जखमा
तोंडाला मास्क लावून आलेल्या हल्लेखोराने मिश्रा यांच्यावर चाकूने सपासप वार केले. यामध्ये मिश्रा यांच्या पोटात व छातीच्या बाजूला गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याची माहिती आहे.

Web Title: Akola city businessman Ram Prakash Mishra stabbed with a knife attackers ran away