बाजार समितीत धान्याची आवक घटली; दरही घसरले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 20:13 IST2021-05-04T20:13:03+5:302021-05-04T20:13:10+5:30
Akola APMC News : मंगळवारी बाजार समितीत केवळ २ हजार १४६ क्विंटल धान्याची आवक झाली होती.

बाजार समितीत धान्याची आवक घटली; दरही घसरले!
अकोला : संचारबंदीचा परिणाम शहरातील बाजार समितीत पाहावयास मिळत आहे. दररोज होणारी धान्याची आवक घटली असून, दरही कमी झाले आहेत. मंगळवारी बाजार समितीत केवळ २ हजार १४६ क्विंटल धान्याची आवक झाली होती. खरिपात अतिवृष्टीमुळे पिकांना मोठा फटका बसला. त्यामुळे मालाच्या दरामध्ये वाढ झाली. विशेष म्हणजे सोयाबीन व तुरीच्या दरात विक्रमी वाढ झाली. शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत दैनंदिन ३००० ते ३५०० क्विंटल मालाची आवक होत असते. दरही चांगले मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी आपला माल येथे विक्रीस घेऊन येतात. परंतु, मागील काही महिन्यांपासून कोरोना रुग्णवाढीचा वेग वाढला आहे. त्यामुळे राज्य शासनाने संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीतून शेतीशी संबंधित विषय वगळण्यात आले आहेत. तरी या संचारबंदीचा परिणाम बाजार समितीत दिसून येत आहे. बाजार समितीत दररोज होणारी मालाची आवक घटली आहे. मंगळवारी केवळ २ हजार १४६ क्विंटल आवक झाली होती. आवकसोबत दरातही घसरण दिसून येत आहे. सोयाबीन, हरभरा, तुरीचे दर कमी झाले आहेत. २००-२५० रुपये प्रती क्विंटल दर घसरले आहेत.