वादळी पावसाने अकोलेकरांची दाणादाण !
By Admin | Updated: June 3, 2014 01:59 IST2014-06-02T22:03:24+5:302014-06-03T01:59:50+5:30
घरावरील टीन उडाले, वृक्ष उन्मळून पडली, वाहतुकीला खोळंबा, वीज पुरवठा खंडित, एक जखमी

वादळी पावसाने अकोलेकरांची दाणादाण !
अकोला : दोन दिवसांपासून जिल्ह्यात वादळी वार्यासह अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून, पावसापेक्षा वार्याचा वेग अधिक असल्यामुळे सोमवारी अकोलेकरांची दाणादाणा उडाली. मुख्य डाकघराजवळील होर्डिंग्ज रस्त्यावर कोसळून एक इसम जखमी झाला. अनेक ठिकाणी घरावरील टीन उडाले, वृक्ष रस्त्यावर उन्मळून पडली, रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीला खोंळबा झाला. जुने शहरासह शहरातील इतर भागातील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे काळोख पसरला होता.
दोन दिवसांपासून जिल्ह्यात वादळी पाऊस सुरू आहे. सोमवार, २ जून रोजी ४ वाजेपर्यंत ४४.४ अंश डिग्री तापमान होते. ४ वाजतानंतर अचानक ढग भरू न आले. सोसाट्याचा वारा सुटला. या वार्यामुळे मुख्य डाकघरासमोरील होर्डिंग्ज रस्त्यावर कोसळल्याने विठ्ठल कांबळे जखमी झाले. रणपिसेनगरातील प्रोफेसर कॉलनीत वृक्ष रस्त्यावर उन्मळून पडल्यामुळे या भागातील वाहतुकीला खोंळबा झाला. मोठी उमरीजवळली रेल्वे पुलाखाली प्रचंड पाणी साचल्याने या भागातील वाहतूक काहीवेळ ठप्प पडली होती. बारा ज्योर्तिलिंग मंदिरासमोर पाणी साचले होते. वृंदावननगरातील घरावरील टीन उडून खांबावर लटकले, सिव्हिल लाईन चौकातील टिनाचे शेड रस्त्यावर पडले होते. आकोट फैल, न्यू तापडियानगर या भागातील देवीच्या मंदिरासमोरील चोपडे गुरुजी यांच्या घरावरील टीन उडाले होते.
** जुने शहर काळोखात
वादळी पावसामुळे जुने शहरातील वीज पुरवठा पूर्णत: खंडित झाला. शहरातील इतर भागातील वीज गायब झाल्यामुळे नगरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.
** लघुउद्योजकांची त्रेधातिरपिट
अचानक विजांचा कडकडाटात आलेल्या वादळीपावसामुळे फेरीवाले, लघुउद्योजकांची चांगलीच धांदल उडाली, वादळामुळे अनेकांचे नुकसान झाले.
** वातावरणात गारवा
अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा पसरल्यामुळे अस उकाड्यातून नागरिकांना हायसे वाटले. दरम्यान, मंगळवार व बुधवारी तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.