Air pollution increased in three more cities | आणखी तीन शहरांमध्ये वाढले हवा प्रदूषण

आणखी तीन शहरांमध्ये वाढले हवा प्रदूषण

अकोला : राज्यातील १८ शहरांमध्ये हवा प्रदूषित असल्याने त्या संस्थांनी उपाययोजनांच्या कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिल्यानंतर आणखी तीन शहरांमध्ये हवा प्रदूषित असल्याचा अहवाल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला आहे. त्या शहरांमध्ये डोंबिवली, ठाणे व पिंप्री चिंचवड या महापालिकांचा समावेश आहे.
पर्यावरणातील महत्त्वाचा घटक तसेच सजीवांसाठी प्राणवायू असलेली हवा प्राणघातक ठरण्याच्या पातळीपेक्षाही अधिक प्रदूषित आहे. राज्याच्या १८ प्रमुख शहरांतील दूषित हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तयार केलेल्या अ‍ॅक्शन प्लॅनची अंमलबजावणी करण्यास महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनच दिरंगाई करण्याचा प्रकार सुरू आहे.
राज्यातील मुंबई, नाशिक, नवी मुंबई, पुणे, बदलापूर, उल्हासनगर, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, लातूर, जळगाव, अकोला व जालना या शहरांमध्ये हवा प्रदूषित असल्याचे हवेची गुणवत्ता तपासणी करणाऱ्या सेंटर्सचे अहवाल आहेत. त्या शहरांतील हवेची गुणवत्ता सुधारण्याचे निर्देश केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले. त्यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधित महापालिकांच्या सहकार्याने प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी कृती आराखडा तयार केला. उपाययोजना राबविण्यासाठी या दोनपैकी कोणत्याही यंत्रणेने हिरिरीने पुढाकार घेतल्याचे कुठेही दिसत नाही. त्यातच आता राज्यातील आणखी तीन शहरांची भर पडली आहे. त्यामध्ये डोंबिवली, ठाणे व पिप्री चिंचवड या महापालिकांनाही हवेची गुणवत्ता अबाधित राखण्यासाठी कृती आराखड्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे.
हवेतील विषारी घटकांचे प्रमाण अधिक असल्याने त्याचा सजीवांवर होणारा विपरीत परिणाम रोखण्याची जबाबदारीही शासनाच्या संस्था, नागरिकांची आहे; मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात कोणीही पुढाकार घेत नसल्याने हा धोका वाढतच जाणार आहे.

 

Web Title: Air pollution increased in three more cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.