‘त्या’ घटनेनंतरही प्रशासन झोपेतच!

By Admin | Updated: May 30, 2017 02:05 IST2017-05-30T02:05:11+5:302017-05-30T02:05:11+5:30

लोहारा येथील दरड कोसळून मजुराचे मृत्यू प्रकरण

After that incident, the administration is asleep! | ‘त्या’ घटनेनंतरही प्रशासन झोपेतच!

‘त्या’ घटनेनंतरही प्रशासन झोपेतच!

लोकमत न्यूज नेटवर्क
लोहारा: येथील मन नदीपात्रात अवैध उत्खनन करण्यासाठी तयार केलेली दरड कोसळल्याने १ मजूर ठार तर १ गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली होती. या प्रकरणाला महसूल विभागाने गांभीर्याने घेतले नसल्याचे २९ मे रोजी दिसून आले. घटनास्थळाला एकाही अधिकाऱ्यांनी भेट दिली नसल्याने पुन्हा त्याच स्थळावरून रेतीचे उत्खनन करण्यात आले.
लोहारा शिवारातील मन नदीच्या पात्रालगतच्या राम अवतारसिंह सिंघेल यांच्या मालकीचा गट नं ८०१ या शेताच्या मन नदी काठावरील भागात भूभाग खोदून रेती भरत असताना दरड कोसळून गोकुळ कैलास नराळे रा. मानेगाव हा मजूर ठार झाला होता, तर एक मजूर जखमी झाला होता. या घटनेतील जखमी चौधरी यांच्यावर अकोल्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, तो सध्या धोक्याबाहेर असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी शेगाव शहर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, सदर गुन्हा हा उरळ पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे. घटनेच्या दुसऱ्या दिवशीच्या सायंकाळपर्यंत एकही अधिकाऱ्याने घटनास्थळावर किंवा मृतकाच्या घरी भेट दिली नाही. त्यामुळे दुपारपासून पुन्हा रेतीची वाहने त्याच स्थळावरून रेती उचल करीत असल्याचे दिसून आले.

परवानगी दीड फुटाची; खोदले ३० फूट
रेती घाटात दीड फूट खोदण्याची परवानगी असताना अनेक ठिकाणी २० ते ३० फूट खोल कोदकाम करून रेतीची वाहतूक केल्या जात आहे. असाच प्रकार लोहारा येथील रेती घाटावर झालेला आहे. येथे एक फूट ७.५ इंच खोलपर्यंत खोदण्याची परवानगी असताना या भागात २० ते ३० फुटापर्यंत खोदकाम करण्यात आले आहे. बुलडाणा येथील अमित काळकर या कंत्राटदाराने आतापर्यंत हजारो ब्रास रेतीची वाहतूक केलेली आहे. तर सदर रेती घाटावर मोठमोठे खड्डेही करून ठेवले आहे. याकडे संबंधितांनी दुर्लक्ष केल्याने मजुराच्या मृत्यूला तेही जबाबदार आहेत.

घटनास्थळ हे महसुली भाग क्रमांक १ मध्ये येत असून, त्या स्थळाची हरासी झालेली आहे. रेती उचल करण्याची जागा लांबी ५५८ मीटर, रुंदी ९ मीटर तर खोल ०.५० मीटरचा परवाना देण्यात आलेला आहे.
- डी.पी. पुंडे, तहसीलदार, बाळापूर

Web Title: After that incident, the administration is asleep!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.