रेल्वेला दुर्गंधीमुक्त करण्याची प्रशासनाची तयारी
By Admin | Updated: May 15, 2015 01:47 IST2015-05-15T01:36:32+5:302015-05-15T01:47:54+5:30
प्रत्येक तिस-या डब्यानंतर शौचालयांचा डबा लावण्याचा प्रस्ताव विचाराधिन.

रेल्वेला दुर्गंधीमुक्त करण्याची प्रशासनाची तयारी
राम देशपांडे / अकोला : स्वच्छ रेल्वे, स्वच्छ भारत या दिशेने पाऊल टाकताना भारतीय रेल्वे प्रशासन रेल्वेला दुर्गंधीमुक्त करण्यासाठी तत्पर झाले. प्रवासी गाड्यांमध्ये जैविक तंत्रज्ञानावर आधारित शौचालये निर्माण करण्यासाठी लागणारा खर्च लक्षात घेता, प्रत्येक प्रवासी गाडीच्या तिसर्या डब्यानंतर केवळ आधुनिक स्वरूपाची पण, सामान्य शौचालये असलेली बोगी लावण्याचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाच्या विचाराधिन आहे. वर्ष २0१४-१५ चा रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी २0२0-२१ पर्यंत देशातील सर्व प्रवासी गाड्यांमध्ये जैविक शौचालये उभारण्याची घोषणा केल्याप्रमाणे त्याची अंमलबजावणीदेखील सुरू झाली होती. मात्र, या पर्यावरणपूरक शौचालयांची उभारणी खर्चिक असल्याचे स्पष्ट करीत रेल्वे वाहतूक विभागातील वरिष्ठ अधिकारी व रेल्वे बोर्डाचे संचालक अन्वर हुसैन शेख यांनी रेल्वे प्रशासनाकडे एक अभिनव संकल्पना मांडली आहे. केवळ एक जैव शौचालय उभारणीसाठी रेल्वेला १६ लाख रुपये खर्च येतो, तर ५३ हजार प्रवासी डब्यांमध्ये या पर्यावरणपूरक शौचालयांच्या उभारणीकरिता सुमारे ८ कोटी रुपये खर्च येणार आहे. हुसैन यांनी मांडलेल्या संकल्पनेत प्रवासी डब्यांमधील सर्व शौचालये काढून टाकण्यावर भर दिला असून, प्रवासी गाडीच्या प्रत्येक तिसर्या डब्यानंतर केवळ शौचालय असलेला डबा लावण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे. या डब्यातील एक शौचालय उभारणीकरिता रेल्वेला २0 लाख रुपये खर्च करावा लागणार असला तरी, केवळ शौचालय असलेल्या ५३ हजार डबे तयार करण्यासाठी रेल्वेला केवळ १ कोटी रुपये खर्च करावा लागेल. ज्याठिकाणी जैविक शौचालये उभारणीकरिता रेल्वे ८ कोटी रुपये खर्च करणार आहे, त्या ठिकाणी केवळ १ कोटीच खर्च करावा लागेल. या डब्यातील सर्व शौचालये अत्याधुनिक मात्र सामान्य राहतील. डब्याच्या वरच्या भागात पाणीसाठा, तर खालच्या भागात मलमूत्र जमा करण्याची व्यवस्था राहील. प्रवासादरम्यान विशिष्ट अंतरावर केवळ शौचालये असलेल्या डब्यातील मलमूत्र भूमिगतपद्धतीने जमा करून त्यापासून खतनिर्मिती करता येईल, अशी अभिनव संकल्पना अन्वर शेख यांनी मांडली आहे. यामुळे प्रवासी डब्याच्या प्रत्येक प्रवेशद्वाराजवळ असलेल्या शौचालयामुळे निर्माण होणारी दुर्गंधी तर दूर होईलच, याशिवाय रेल्वे मार्गावर होणारी अस्वच्छता दूर होईल. या प्रस्तावाचा रेल्वे बोर्डाने सकारात्मक विचार करण्यास प्रारंभ केला असून, येणार्या काळात त्याचे दृष्य परिणाम दिसतील, अशी माहिती आहे.