८४ खेडी योजनेचा वीजपुरवठा जोडा अन्यथा साेमवारी आंदाेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:17 IST2021-03-20T04:17:05+5:302021-03-20T04:17:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : ६४ खेडी खांबोरा प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजना व ८४ खेडी पाणीपुरवठा योजनांचा ...

८४ खेडी योजनेचा वीजपुरवठा जोडा अन्यथा साेमवारी आंदाेलन
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : ६४ खेडी खांबोरा प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजना व ८४ खेडी पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा जाेडावा तसेच ग्रामीण भागात टॅंकरद्वारे पाणी पोहोचविण्याची कारवाई युद्धस्तरावर करण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासन व राज्य शासनाकडे पाठपुरावा करून जनतेला पाणी उपलब्ध करून द्यावे. अन्यथा २२ मार्च रोजी जिल्ह्यात जनआंदोलन उभे करू, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी दिला आहे. शुक्रवारी आमदार सावरकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव कटियार यांची भेट घेऊन याविषयी चर्चा केली.
६४ खेडी खांबोरा प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजना व ८४ खेडी पाणीपुरवठा योजनांच्या संदर्भात आमदार सावरकर यांनी महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंत्यांची भेट घेतल्यानंतर शुक्रवारी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. ग्रामीण भागातील वाढीव वीज कपात, कृषिपंपधारकांना हाेणारा त्रास, या सगळ्यासह ते विकासकामांना लागलेला ‘ब्रेक’ याविरोधात जिल्ह्यात आंदोलन उभारले जाईल, असा इशारा आमदार सावरकर यांनी दिला. ग्रामीण भागातील बिकट जलसंकट परिस्थितीचा विचार करता, जिल्हा परिषदेने जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून मार्ग काढून नागरिकांना पाण्यासारख्या मूलभूत सुविधेपासून वंचित ठेवण्याचे महापाप करू नये, असा इशाराही आमदार सावरकर यांनी दिला. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस माधव मानकर, जिल्हा परिषद सदस्य पवन बुटे, भाजपचे माजी अकोला तालुकाध्यक्ष अनिल गावंडे आदी उपस्थित होते.