तालुका-जिल्हास्तरावर तयार होणार कृती आराखडा!

By Admin | Updated: December 27, 2014 23:46 IST2014-12-27T23:46:36+5:302014-12-27T23:46:36+5:30

जलयुक्त शिवार अभियानाची अंमलबजावणी.

Action plan prepared on taluka-district | तालुका-जिल्हास्तरावर तयार होणार कृती आराखडा!

तालुका-जिल्हास्तरावर तयार होणार कृती आराखडा!

संतोष येलकर/ अकोला: राज्यातील टंचाई परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी शासनामार्फत जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीत जिल्हा आणि तालुकास्तरावर कामांचा आराखडा लवकरच तयार करण्यात येणार आहे.
राज्यात जवळपास ८२ टक्के क्षेत्र कोरडवाहू आणि ५२ टक्के क्षेत्र अवर्षण प्रवण आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, राज्यातील २२ जिल्ह्यांमधील १९ हजार ५९ गावांमध्ये टंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे. टंचाई परिस्थिती निर्माण झालेल्या गावांमध्ये प्राधान्याने जलयुक्त शिवार अभियान राबविण्याची गरज आहे; तसेच भविष्यात राज्यातील उर्वरित भागात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी टंचाई परिस्थितीवर मात करण्याकरिता राज्यातील सर्वच जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यास शासनाच्या गत ५ डिसेंबर रोजीच्या निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीत विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विभागीय समन्वय समिती, जिल्हास्तरीय समिती आणि तालुकास्तरीय समित्या गठित करण्यात येत आहेत. त्यामध्ये जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीमार्फत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यातील गावांची आणि कामांची निवड करून, जिल्हास्तरीय कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे; तसेच उपविभागीय अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील तालुकास्तरीय समित्यांमार्फत सर्व यंत्रणांच्या समन्वयाने तालुकास्तरीय आराखडा तयार करण्यात येणार आहे. तालुकास्तरावर तयार करण्यात आलेला आराखडा जिल्हास्तरीय समितीकडे सादर करण्यात येणार आहे.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये करावयाच्या कामांचा तालुकास्तरीय कृती आराखडा लवकरच तयार करण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Action plan prepared on taluka-district