महाप्रसाद कार्यक्रमावर मनपाची कारवाई
By Admin | Updated: August 29, 2014 01:44 IST2014-08-29T01:34:57+5:302014-08-29T01:44:02+5:30
महाप्रसाद कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न; उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार.

महाप्रसाद कार्यक्रमावर मनपाची कारवाई
अकोला : रामदेव बाबा सेवा समितीच्यावतीने आयोजित जम्मा जागरणचा महाप्रसाद कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न गुरुवारी उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्या चांगलाच अंगलट आला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या सेवा समिती व भाजपच्यावतीने उपायुक्त चिंचोलीकर यांच्याविरोधात खदान पोलिस ठाण्यात निवेदनवजा तक्रार नोंदविण्यात आली. ही कारवाई प्रशासनाला भोवण्याची शक्यता आहे.
रामदेव बाबा सेवा समितीच्यावतीने शहरात रामदेव बाबा यांची ज्योत आणण्यात आली आहे. गोरक्षण रोड परिसरातील कीर्ती नगरस्थित कमल टेकडीवाल परिवार व सेवा समितीच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातीलच एका खुल्या भूखंडावर जेवणाचा कार्यक्रम सुरू असताना, मनपा उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी अतिक्रमण पथकासह याठिकाणी धाव घेतली. महाप्रसादाच्या कार्यक्रमासाठी खुल्या जागेवर मंडप उभारण्यासाठी प्रशासनाची परवानगी घेतली नसल्याची सबब पुढे करीत उपायुक्त चिंचोलीकर यांच्या आदेशानुसार अतिक्रमण पथक प्रमुख विष्णू डोंगरे यांनी मंडपातील खुच्र्या, कुलर व इतर साहित्य जमा करण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून नगरसेविका करुणा इंगळे यांचे पती विजय इंगळे, नगरसेवक अजय शर्मा यांनी सदर कारवाईला तीव्र विरोध दर्शवला. जेवण करणार्या महिलांना ताटावरून उठविण्यात आल्याचा आरोप करीत संतप्त नागरिकांनी उपायुक्तांना हा प्रकार थांबवण्याची विनंती केली. नगरसेवक गोपी ठाकरे यांनी उपायुक्तांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; परंतु यावेळी नागरिकांचा रोष लक्षात घेता, उपायुक्तांसह इतर कर्मचार्यांनी काढता पाय घेणे पसंत केले. मनपा उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी
या भागातून जात असताना खुल्या भूखंडावर हा कार्यक्रम होत असल्याचे निदर्शनास आले. माहिती घेतली असता, कार्यक्रमासाठी मनपाची परवानगी घेतली नसल्याचे समोर आले. जेवण करणार्यांना उठवले नाही किंवा कोणतेही असभ्य वर्तन झाले नाही. ताब्यात घेतलेले साहित्य लगेच परत करण्यात आल्याचे त्यांनी सांगीतले.
*उपायुक्तांविरोधात पोलिसात तक्रार
धार्मिक कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न करणार्या उपायुक्त चिंचोलीकर यांच्याविरोधात रामदेव बाबा सेवा समिती व भाजपच्यावतीने खदान पोलिस ठाण्यात धाव घेऊन निवेदनवजा तक्रार करण्यात आली. यामध्ये मंडपातील गणपती मूर्तीची तोडफोड करणे, महिलांसोबत असभ्य वर्तन करणे, धार्मिक भावना दुखावणे आदी कारणे नमूद करण्यात आली. निवेदनावर आमदार गोवर्धन शर्मा, डॉ.अशोक ओळंबे पाटील, हरीश आलीमचंदानी, अँड.जी.बी. लोहिया, अँड. सत्यनारायण जोशी, सेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश मिश्रा, गिरीश जोशी, नगरसेवक अजय शर्मा, विजय इंगळे, योगेश अग्रवाल यांच्यासह असंख्य नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.
*वरिष्ठांची दिशाभूल करणारे ते कर्मचारी कोण?
उपायुक्त चिंचोलीकर यांच्या सतत अवतीभोवती घुटमळणार्या कर्मचार्यांनी हा कार्यक्रम सुरू असल्याची माहिती उपायुक्तांना दिल्याची माहिती आहे. त्यानंतरच ही कारवाई झाली. या प्रकारामुळे पुन्हा एकदा चिंचोलीकर वादाच्या भोवर्यात अडकले. वरिष्ठ अधिकार्यांची दिशाभूल क रणार्या कर्मचार्यांची उचलबांगडी करणे नितांत गरजेचे झाले आहे.
*राम मंदिरात आज बैठकीचे आयोजन
प्रशासनाच्या हुकूमशाही कारवाईच्या विरोधात रामदेव बाबा सेवा समिती व भाजपच्यावतीने २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता मोठे राम मंदिर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती गिरीश जोशी यांनी दिली.