कामगाराचे अपहरण करून डांबून ठेवणारे बडे आरोपी मोकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 10:38 AM2020-10-27T10:38:19+5:302020-10-27T10:38:47+5:30

Akola Crime News बड्या हस्तींच्या पुत्राला अभय दिल्याचा आरोप तक्रारकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

Accused of kidnapping still not arested in Akola | कामगाराचे अपहरण करून डांबून ठेवणारे बडे आरोपी मोकाट

कामगाराचे अपहरण करून डांबून ठेवणारे बडे आरोपी मोकाट

Next

अकोला : जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात मद्यसम्राट म्हणून ओळख असलेल्या राजू जयस्वाल यांचा पुत्र अर्पित जयस्वाल आणि त्याचा मॅनेजर रवी सातव या दोघांनी दोन लाख रुपयांच्या वसुलीसाठी त्यांच्याच नोकराचे अपहरण करून त्याला डांबून ठेवत शारीरिक आणि मानसिक छळ केला. सुरुवातीला आरोपींना पाठीशी घालणाऱ्या जुने शहर पोलिसांवर दबाव येताच अपहरण, अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्ट व विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले; मात्र या प्रकाराला १५ दिवसांचा कालावधी उलटल्यावरही पोलिसांनी आरोपींना अटक केली नसल्याने बड्या हस्तींच्या पुत्राला अभय दिल्याचा आरोप तक्रारकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

रामदास पेठेतील रहिवासी अर्पित राजेंद्र जयस्वाल आणि मॅनेजर रवी सातव या दोघांनी त्यांच्याच किरकोळ विक्री देशी दारूच्या दुकानात काम करणारा नोकर संजय जगदेव हातोले याला ७ ऑक्टोबर रोजी भागीरथवाडी येथे दोन लाख रुपयांच्या वसुलीसाठी पाठविले होते; मात्र रक्कम वसूल न झाल्याने अर्पित जयस्वाल आणि मॅनेजर रवी सातव या दोघांनी संजय जगदेव हातोले यांना बळजबरीने महागड्या पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसवून नेत अपहरण केले होते. त्यानंतर कारमध्ये हातोले यांना मारहाण करीत शहरात कार फिरवीली; मात्र एवढ्यावर समाधान न झाल्याने पैशाच्या गुर्मीत मस्ताळलेल्या अर्पित व मॅनेजरने नोकराला शासकीय दूध डेअरीसमोरील कार्यालयात नेऊन बेदम मारहाण केली. त्यानंतर डांबून ठेवत शारीरिक व मानसिक छळ केला. दरम्यान, नोकराच्या फोनवरून त्याच्या घरी फोन करून आधार कार्ड, पॅन कार्ड व बँक पासबुक मागविले. त्यांचा मुलगा दस्तावेज घेऊन येताच मॅनेजर रवी सातवने ते ताब्यात घेऊन मुलाला बाहेर काढले. दरम्यान, हातोले याला पुन्हा कारमध्ये रामदास पेठेतील गॅस गोदामाच्या पाठीमागे नेण्यात आले व येथेही बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणाची तक्रार संजय हातोले यांनी जुने शहर पोलीस ठाण्यात दिली; मात्र सुरुवातीला पोलिसांनी त्यांना हाकलून देण्याचाच प्रयत्न केला; मात्र दबाव वाढत असल्याचे पाहताच ३२४ अन्वये गुन्हा दाखल करून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यानंतर ४ दिवसांचा कालावधी उलटल्यावर अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्ट आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यावरून पोलिसांनी सुरुवातीपासूनच आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. आता या घटनेला १५ दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटला; मात्र पोलिसांनी अद्यापही आरोपींना अटक केली नाही. यावरून अकोला पोलीस आता बड्या धेंडांच्या ओझ्याखाली दबल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Web Title: Accused of kidnapping still not arested in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.