प्राणघातक हल्ल्यातील आरोपींना सात वर्षांचा सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:34 IST2021-02-21T04:34:44+5:302021-02-21T04:34:44+5:30

युसुफ अली खदानवर घडली होती घटना लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील युसूफ अली खदान येथे ...

Accused of assault sentenced to seven years rigorous imprisonment | प्राणघातक हल्ल्यातील आरोपींना सात वर्षांचा सश्रम कारावास

प्राणघातक हल्ल्यातील आरोपींना सात वर्षांचा सश्रम कारावास

युसुफ अली खदानवर घडली होती घटना

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील युसूफ अली खदान येथे युवतीच्या छेडछाडीवरून झालेल्या हाणामारीत तलवारीने प्राणघातक हल्ला करणाऱ्या नऊ आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश भालेराव यांनी शनिवारी सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच आरोपींना दंडही ठोठावला असून, दंड न भरल्यास अतिरिक्त शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे.

युसूफ अली खदान येथे एका युवतीच्या छेडछाडीवरून दोन गटात मोठी हाणामारी झाली होती. यावेळी शेख शेरू पैलवान व त्याच्या साथीदारांनी संजय काळे यांचे भाऊ दीपक काळे, मनिष बुंदेले व गणेश सोनोणे यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला होता. या हल्ल्यात दीपक काळे यांच्या डोक्यावर तलवारीने हल्ला केला, यावेळी त्यांच्या हाताची तीन बोटे तुटली होती. याप्रकरणी संजय काळे यांनी खदान पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी शेख शेरू पैलवान, असगर, रोशन, शफिक, आरिफ, नुसरत, अनू, राजीक आणि एजाज यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या प्रकरणाचा कसून तपास करत पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. के. भालेराव यांच्या न्यायालयात या हाणामारी प्रकरणाची सुनावणी झाली. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद झाल्यानंतर आरोपींविरुद्ध मिळालेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे त्यांना भारतीय दंड विधानाच्या कलम ३०७ अन्वये सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच आरोपींना दंडही ठोठावण्यात आला आहे. हा दंड न भरल्यास अतिरिक्त शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे ॲड. आनंद गोदे यांनी काम पाहिले.

Web Title: Accused of assault sentenced to seven years rigorous imprisonment