अकोल्यात जुने शहर दंगल व हत्या प्रकरणातील आरोपी गजाआड
By सचिन राऊत | Updated: July 28, 2023 18:08 IST2023-07-28T18:08:05+5:302023-07-28T18:08:36+5:30
जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंस्टाग्रामवरील चॅटिंग व्हायरल केल्यानंतर दोन गटात १३ मे रोजी प्रचंड दंगल उसळली होती.

अकोल्यात जुने शहर दंगल व हत्या प्रकरणातील आरोपी गजाआड
अकोला : जुणे शहर व रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दंगल प्रकरणातील तसेच पोळा चौकात विलास गायकवाड नामक युवकाची हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी अटक केली.
जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंस्टाग्रामवरील चॅटिंग व्हायरल केल्यानंतर दोन गटात १३ मे रोजी प्रचंड दंगल उसळली होती. यावेळी एका विशिष्ट समुदायातील दंगलखोरांनी इलेक्ट्रिशियनचे काम करीत असलेला युवक विलास गायकवाड यांच्यावर धारदार शस्त्र व लाकडी राफ्टरने हल्ला चढवून त्यांची हत्या केली होती. यासोबतच परिसरातील दुकानांमध्ये जाळपोळ करणे, पोलिसांना मारहाण करणे, वाहन पेटवून देणे, दुकानांमधील साहित्याची फेकफाक करणे असा हैदोस घातला होता. या प्रकरणी जुने शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते.
या हत्या व दंगल प्रकरणात अब्दुल शकील अब्दुल रशीद उर्फ शकील बुढा घासलेटवाला रा खिडकीपुरा यास स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून मुख्य आरोपी फरार होता. त्यास शुक्रवारी अटक केली असून पुढील तपासासाठी जुने शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी केली.