Accident Two-wheeler and truck; Two youths killed on the spot | ट्रकची दुचाकीस धडक; दोन युवक घटनास्थळीच ठार
ट्रकची दुचाकीस धडक; दोन युवक घटनास्थळीच ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर : भरधाव ट्रकने दुचाकीस जबर धडक दिल्यााने दोन युवक जागीच ठार झाले. ही घटना १८ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता राष्ट्रीय महामार्गावरील नागोली नागठाणा गावाजवळ घडली. ज्ञानेश्वर वैजनाथ पाटील (२४), आशिष देवीदास कस्तुरे (२२) रा. कंचनपूर ता. खामगाव असे मृतांचे नाव आहे. वाहन कोणते होते हे अद्याप कळाले नाही.
ज्ञानेश वैजनाथ पाटील व आशिष देवीदास कस्तुरे हे दुचाकी क्र. एमएच २८ एक्स ०३४३ ने खामगाववरून अमरावतीकडे कामानिमित्त जात होते. दरम्यान, समोरुन येणाऱ्या भरधाव ट्रक क्र. जीजे 0३ पीटी ६१९७ ने जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
दोन्ही मृत हे बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील कंचनपूर येथील रहिवासी आहेत. घटनेनंतर पसार झालेल्या वाहनाचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले. घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली, तसेच पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्थानिक लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मृतांच्या नातेवाइकांना यासंदर्भात माहिती देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास ठाणेदार रहीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Accident Two-wheeler and truck; Two youths killed on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.