नागपूरकडे जाणार्या रुग्णवाहिकेला अपघात; आगर गावावर शोककळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 20:21 IST2017-12-04T20:20:25+5:302017-12-04T20:21:00+5:30
नागपूर येथे जात असलेल्या रुग्णवाहिकेला टॅँकरने धडक दिल्याने चार जणांचा जागेवरच मृत्यू झाला, तर चौघे गंभीर जखमी झाले. या घटनेत आगरच्या तिघांचा समावेश आहे. तिन्ही मजुरांचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.

नागपूरकडे जाणार्या रुग्णवाहिकेला अपघात; आगर गावावर शोककळा!
लोकमत न्यूज नेटवर्क
आगर (अकोला): नागपूर येथे घेऊन जात असलेल्या रुग्णवाहिकेला टॅँकरने धडक दिल्याने चार जणांचा जागेवरच मृत्यू झाला, तर चौघे गंभीर जखमी झाले. या घटनेत आगरच्या तिघांचा समावेश आहे. तिन्ही मजुरांचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.
पोटाची खळगी भरण्यासाठी आगर येथील मजूर परिसरातील गावांमध्ये ऑटोने कपाशी वेचण्यासाठी जातात. रविवारी गावातील काही मजूर खांबोरा येथील भरणे यांच्या शेतात कपाशी वेचण्यासाठी गेले होते. सायंकाळी परत येत असताना त्यांच्या ऑटोला टॅक्टरने धडक दिली. यामध्ये तिघे गंभीर जखमी झाले होते. या सर्व जखमींना अकोला सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जखमींपैकी दोघांना पुढील उपचारार्थ नागपूर येथे रुग्णवाहिकेने रविवारी रात्री हलवण्यात आले. त्यांच्याबरोबर काही नातेवाईकही होते. यातील चौघांसाठी ही रात्र शेवटची ठरली.
भालेराव कुटुंबावर काळाची झडप
आपल्या आजीबरोबर कपाशी वेचण्यासाठी गेलेला आकाश भालेराव हा अपघातात जखमी झाला होता. त्याला पुढील उपचारासाठी नागपूर येथे नेण्यात येत होते. त्याच्याबरोबर त्याची आईही रुग्णवाहिकेने जात होती. या रुग्णवाहिकेला अपघात झाल्याने आकाश भालेराव व त्याच्या आईचा मृत्यू झाला, तर त्याची आजी अकोला येथे उपचार घेत आहे. या घटनेतून त्याचे वडील मात्र सुदैवाने बचावले.
वह्या, पुस्तके घेण्याचे स्वप्न राहिले अपूर्ण
दैनंदिन खर्च भागवण्यासाठी दररोज मजुरी करावी लागणार्या भालेराव कुटुंबाला मुलांच्या शिक्षणाचा खर्चही पेलवत नव्हता. त्यामुळे वह्या, पुस्तके घेण्यासाठी रविवारी सुटीचा दिवस असल्याने तो आपल्या आजीबरोबर कपाशी वेचण्यासाठी गेला होता. सातव्या वर्गात शिकणार्या आकाशला वह्या, पुस्तकांसाठी कापूस वेचणे जीवावर बेतले. अपघातात दुर्दैवी निधन झाल्याने त्याचे वह्या, पुस्तके घेण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले.